Breaking News

राजा शिवछत्रपती परिवाराकडून रत्नदुर्ग किल्ल्याची साफसफाई

रत्नागिरी, दि. 05, ऑक्टोबर - राजा शिवछत्रपती परिवाराने येथील रत्नदुर्ग किल्ल्याची साफसफाई करून दुर्गसंवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला. या मोहिमेत  रत्नागिरीसह मुंबई आणि रायगड विभागातील सदस्य सहभागी झाले होते.
राजा शिवछत्रपती परिवाराची स्थापन 31 जुलै 2014 झाली असून ही पूर्णपणे राजकीय पक्षविरहित संघटना आहे. सांगलीचे सुनील सूर्यवंशी अध्यक्ष तर मुंबईचे  आशीष घोरपडे उपाध्यक्ष आहेत. परिवाराचे संपूर्ण महाराष्ट्रभर एकूण 14 विभाग कार्यरत आहेत. एका विभागामार्फत एका वर्षात बारा मोहिमा राबविल्या जातात, तर  दर 3 महिन्यांनी सर्व विभागांची एकत्रित 2 दिवसांची मोहीम राबवली जाते. संपूर्ण विभागात सुमारे 8 हजार कार्यकर्ते कार्यरत आहेत. गडकोट संवर्धन, स्वच्छता,  किल्ल्यावर वृक्षारोपण, अनाथाश्रमांना साहित्य वाटप, योग्य ठिकाणी सूचना फलक अशी या परिवाराची उद्दिष्टे आहेत. केवळ फेसबुक आणि व्हॉट्सपच्या माध्यमातून  परिवाराची जनजागृती केली जाते. यात महिलांचा लक्षणीय सहभाग आहे.
या परिवाने रत्नदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. मोहिमेत मुंबई विभागातील महेश पवार, आशीष घोरपडे, रायगड विभागातील जयेश भोईर, किरण भोईर,  रत्नागिरी विभागातील अमोल पवार, अलंकार मयेकर, महेश जाधव, विशाल हळदणकर, सनी कळंबटे गौरव सुर्वे, नीलेश जाधव, स्वप्नील मांडे, अक्षय थोरात, वैभव  देशमुख, निखिलेश शिवगण रवींद्र पांचाळ सहभागी झाले. तटबंदीवरील वाढलेली झाडे साफ करण्यात आली. बुरूज स्वच्छता, भुयारी मार्गावरचे गवत आणि  किल्ल्यावरचा प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. बुरुजावर कोरलेली नावे काढून बुरूज स्वच्छ करण्यात आले. दीपगृहाच्या बाजूला असलेल्या 3 तोफा गवताने  वेढलेल्या होत्या. त्या मोकळ्या करण्यात आल्या. दुपारी महेश पवार यांनी परिवाराच्या यशस्वी वाटचालीची माहिती सर्वांना दिली. दुपारनंतर किल्ल्यावर योग्य  ठिकाणी सूचना आणि दुर्गसंवर्धनाविषयीचे विविध 12 फलक लावण्यात आले. किल्ल्यावर साफसफाई करताना पर्यटक म्हणून आलेल्या 2 लहान मुलींनीसुद्धा या  कामात सहभागी होऊन खारीचा वाटा उचलला आणि दुर्गसंवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. भगवती मंदिरासमोरच्या ध्वजस्तंभावर नवीन भगवा  झेंडा फडकवून मोहिमेची सांगता झाली.