Breaking News

उपनगरी प्रवाशांना सुविधा दिल्याखेरीज बुलेट ट्रेन चे काम सुरु होऊ देणार नाही - राज ठाकरे


मुंबई, दि. 01, ऑक्टोबर - मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवाशांना सुविधा पुरवल्याखेरीज बुलेट ट्रेन च्या कामाला मुंबईत सुरूवात होऊ देणार नाही , असा इशारा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला . मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात 5 सप्टेंबर रोजी चर्चगेट स्थानकावर  मोर्चा काढण्यात येणार आहे असेही त्यांनी जाहीर केले . 
काल झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी होती. या घटनेबाबत आणि यासारख्या घटनांबद्दल जाब विचारण्यासाठी 5 ऑक्टोबरला (गुरूवारी) चर्चगेट येथील पश्‍चिम  रेल्वेच्या मुख्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असून त्यात मी स्वत: सहभागी होणार आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. हा विषय गर्दीचा नाही, तर राग व्यक्त  करण्याचा आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही ठाकरे यांनी केले.
काल झालेल्या घटनेच्या ठिकाणी मी स्वत: मुद्दाम गेलो नाही. कारण तिथे पोलीस, डॉक्टर्स, सुरक्षा व बचाव पथके स्वत:चे कार्य करत होते. त्यात मी तेथे गेल्याने  सुरक्षा यंत्रणेवर अधिकचा ताण पडला असता, असे राज यांनी स्पष्ट केले.
इतर वेळी न दिसणारे काही लोक घटनास्थळी काल दिसले, त्याचे कारण तेथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भाजपचे नेते किरीट सोमय्या हे काँग्रेस  सरकारच्या कार्यकाळात रेल्वे प्रश्‍नांबाबत आग्रही होते. पण आता त्यांचे सरकार असताना ते गप्प का आहेत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या 10 ते  15 वर्षांपासून मनसेचे बाळा नांदगावकर आणि संजय गवते हे या आणि या सारख्या पूलांबाबतचे गा-हाणे सरकारदरबारी मांडत आहेत. पण त्यावर ‘या पुलांच्या  डागडुजीचे काम हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे आहे’, असे उत्तर मिळाले. याचाच अर्थ व्यवस्थेतील सर्व कर्मचारी आणि अधिका-यांना आपली  जबाबदारी झटकण्याची सवय लागली आहे, अशी टीका राज यांनी केली.
मुंबईत दररोज हजारोंच्या संख्येने परप्रांतियांचे लोंढे येतात. त्यामुळे मुंबईत गर्दी प्रचंड वाढली आहे. परंतु व्यवस्था मात्र उदासीन आहे. चालण्यासाठी असलेल्या  पदपथांवर फेरीवाल्यांचे साम्राज्य आहे. गाड्या चालवण्यासाठी रस्तेही अपुरे पडत आहेत. रेल्वे स्थानकांची आणि पूलांची स्थिती पाहता काल सारखी घटना ही कधी  ना कधी होणारच होती. त्यामुळे जोवर बाहेरून येणा-यांचे लोंढे थांबत तोवर शहरे अशीच बकाल होत राहणार, असेही राज ठाकरे म्हणाले.