Breaking News

चंद्रपूर येथे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने कर्करोग रुग्णालय - सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 24, ऑक्टोबर - चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी चंद्रूपर येथे 100 खाटांचे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय टाटा ट्रस्टच्या सहकार्याने उभारण्यात येत  असल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील कर्करोग ग्रस्त रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. या बाबत श्री. मुनगंटीवार म्हणाले की, टाटा ट्रस्ट, चंद्रपूर जिल्हा खनिज  विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. रुग्णालयाची इमारत जिल्हा प्रशासनाच्यावतीने बांधण्यात येईल तर यंत्रसामग्री, तज्ज्ञांचे मार्गदर्शन याची  जबाबदारी टाटा ट्रस्टने घेतली आहे. यासाठी आवश्यक असलेला सामंजस्य करार लवकरच करण्यात येईल येत्या वर्षभरात हे रुग्णालय उभारण्यात येऊन त्याचा लाभ कर्क रोगग्रस्तांना घेता येईल.
तसेच यासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात एक पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात करुन डॉक्टरांना कॅन्सर उपचाराचे प्रशिक्षण देण्यात येईल व टाटा मेमोरियल हॉस्पीटल या  सर्वासाठी मार्गदर्शक संस्था म्हणून काम करेल, असे सांगून मंत्री महोदयांनी या संपूर्ण सहकार्याबद्दल टाटा ट्रस्टचे आभार व्यक्त केले.
सधन शेतकरी प्रकल्प
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल, पोंभूर्णा, बल्लारपूर, जिवती, गोंडपिंपरी, नागभीड तालुक्यांमध्ये टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने सधन शेतकरी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. टाटा ट्रस्टच्या  वतीने या तालुक्यांमध्ये सुक्ष्म नियोजन तसेच माहिती संकलनाचे काम करण्यात येणार आहे. कुक्कूटपालन, शेळी पालन, दुग्धव्यवसाय क्लस्टर, फलोत्पादन, सुक्ष्म सिंचन या सुविधा  उपलब्ध करून देऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवणे तसेच त्यांचे जीवनमान ऊंचावणे यासाठी सधन शेतकरी प्रकल्पाच्या माध्यमातून काम करण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री  महोदयांनी यावेळी दिली.