Breaking News

राज्यातील मुद्रांक विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत बंद

सांगली, दि. 06, ऑक्टोबर - राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात 19 हजार कोटी रूपये किंमतीचे मुद्रांक शिल्लक आहेत. नोटाबंदी निर्णयासारखाच  अचानकपणे मुद्रांक विक्री बंदीचा निर्णय घेऊन राज्य शासन सर्वसामान्यांना वेठीस धरत आहे, असा आरोप राज्य शासन मान्य मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटनेचे  सांगली विभागप्रमुख मोहन वाघ यांनी केला. राज्य शासनाच्या या धोरणाविरोधात सोमवार दि. 9 ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार  असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्य शासनाकडे मुद्रांक विक्रेते आगाऊ पैसे जमा करतात, तेव्हाच त्यांना मुद्रांक उपलब्ध होतात. वास्तविक, ही राज्य शासनाची चुकीची पध्दत आहे. विक्रेत्यांना  दररोज जेवढी गरज आहे, तितकेच मुद्रांक तात्काळ उपलब्ध झाले पाहिजेत. त्यामुळेच राज्यात सध्या 19 हजार कोटी रूपये किंमतीचे मुद्रांक शिल्लक आहेत.  सद्यस्थितीत सर्वसामान्य नागरिक मुद्रांकासाठी ताटकळत बसत आहेत. हा त्रास नागरिकांना सहन होत नसल्याने त्यांच्याकडून मुद्रांक विक्रेत्यांना जबाबदार धरून जाब  विचारला जात आहे. त्यातून नागरिक व मुद्रांक विक्रेते यांच्यात वादावादीचेही प्रकार घडत आहेत.
मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत नुकतेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आलेले आहे. त्यात राज्य शासनाने मुद्रांकांची टंचाई बंद करून पूर्वीप्रमाणे  त्याचे वाटप करावे, राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर दहा टक्के कमिशन मिळावे, राज्यात सुरू असलेले ई- चलन व  ईएसबीटीआर प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्ङ्गत राबवावी, मृत मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाना मिळावा व एएसपी प्रणाली विनाअट  अधिकृत विक्रेते व दस्तलेखक यांना मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांची राज्य शासनाने तातडीने दखल न घेतल्यास सोमवार दि. 9  ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा मोहन वाघ यांनी दिला.