Breaking News

रत्नागिरीत उद्यापासून दोन दिवसांची आयएमएची राज्यस्तरीय परिषद

रत्नागिरी, दि. 05, ऑक्टोबर - इंडियन मेडिकल असोसिएशनची राज्यस्तरीय परिषद येत्या 7 आणि 8 ऑक्टोबरला रत्नागिरीत होणार आहे. 28 वर्षांनंतर ही  परिषद रत्नागिरीत होत आहे. ‘इवकॉन’ असे या परिषदेचे नाव असून, ही परिषद आयएमएच्या स्त्री वैद्यकीय व्यावसायिकांच्या उपशाखेतर्फे आयोजित करण्यात आली  आहे. यासाठी राज्यभरातून एमबीबीएस आणि अ‍ॅलोपॅथीचे 120 डॉक्टर सहभागी होणार आहेत.
यासंदर्भात आयएमएचे अध्यक्ष डॉ. नीलेश शिंदे, महिला उपशाखेच्या पदाधिकारी डॉ. रश्मी आठल्ये यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी डॉ. तोरल शिंदे,  डॉ. पराग पाथरे, डॉ. सोनाली पाथरे, डॉ. अतुल ढगे उपस्थित होते.
महिलांच्या समस्यांविषयी परिषदेत चर्चासत्र होणार आहे. याकरिता नितीन दाढे, डॉ. किरण शाह, डॉ. सय्यद, डॉ. चावला, डॉ. उत्तुरे, डॉ. राहुल शिंपी आदी तज्ज्ञ  मार्गदर्शन करणार आहेत. सध्याच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगामध्ये स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. वयात येणार्‍या मुलींमध्ये  अनियमित पाळी म्हणजेच पीसीओएस हा आजार, शालेय मुलींमध्ये नैराश्य, एकटेपणामुळे सोशल मीडियाचा अतिरेकी वापर, यामुळे पाय घसरतो व कुमारी मातांचे  प्रमाण वाढते. तरुण वयात नोकरी करणार्‍या मुलींमध्येही मासिक पाळीची समस्या आढळून येते. त्यातून पुढे वंध्यत्वाचे प्रमाण वाढते. स्त्रियांमधील मधुमेह, रक्तदाब,  अ‍ॅनिमिया, एचआयव्हीसारखे आजार यावरही परिषदेत चर्चासत्र होणार आहे.