Breaking News

ठाणे, कल्याण स्थानक परिसरांत मनसे’कडून फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड

ठाणे, दि. 22, ऑक्टोबर - रेल्वे स्थानक परिसरातून फेरीवाल्यांना हटवण्याच्या मोहिमेअंतर्गत ठाणे, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात मनसे स्टाईलने  आज सुरुवात केली. ठाणे, कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.
एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानक परिसरातून 15 दिवसांत फेरीवाला हटवा अन्यथा  मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानुसार मनसे कार्यकर्त्यांनी आज हे आंदोलन केले. ठाणे स्थानकाप्रमाणेच कल्याण, डोंबिवली  स्थानकातही मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावले. मनसे कार्यकर्त्यांच्या धसक्याने वसई, अंधेरी, कुर्ला, घाटकोपर आदी स्थानक परिसरांतील  फेरीवालेही आपापल्या नियमित जागा सोडून अन्य ठिकाणी गेल्याचे चित्र होते. डोंबिवली स्थानक परिसरात मनसे कार्यकर्त्यांच्या पाहणी दौ-यानंतर काही  वेळातच फेरीवाले पुन्हा जागेवर आल्याने परिस्थिती जैसे थे झाली. यामुळे मनसे आंदोलनाचा फुसका बार झाल्याचे दिसून आले.