Breaking News

गळीत हंगाम सुरु करण्याआधी आपले भाव जाहीर करावे : आ. मुरकुटे

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - मुळा आणि ज्ञानेश्‍वर साखर कारखान्यांनी हा गळीत हंगाम सुरु करण्याआधी आपले भाव जाहीर करावे असे आवाहन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले आहे.
दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर गाळपासाठी आलेला ऊस कमीच आहे. मागील गळीत  हंगामात राज्यात 3450/- रुपये हा उच्चतम भाव असतांना जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील दोन्हीही  साखर कारखान्यांनी निचोत्तम भाव देऊन तालुक्यातील शेतकर्‍यांचा तोटा केला आहे.
साखर कारखान्यांनी या दिवाळीतही गांजलेल्या शेतकर्‍यांना अडचणीत आणले आहे. ठेवीवरील व्याजातून कपात करणे हे नियमबाह्य असतांना या कारखान्याने ठेवीचे रुपांतर  शेअर्समध्ये करून शेअर्स वाढवले आहेत. 
कारखान्याने घोषित केलेल्या रक्कमा व व्याज शेतकर्‍यांच्या हातात पडलेल्या नाहीत. दोन्ही कारखान्यांनी शेतकर्‍यांना अजून अडचणीत आणून शेतकर्‍यांच्या ठेवीमधून आपल्या  खाजगी संस्थेच्या वसुली केल्या आहेत.  हा प्रकार म्हणजे शेतकर्‍यांचे  खिसेकापून केलेली चोरी  आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक साखर कारखान्याला उसाची रिकव्हरी जाहीर करणे बंधनकारक आहे.  याचे भान तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांनी ठेवावे व त्यानुसारच  एफआरपीप्रमाणे भाव द्यावा. तसेच वजनामध्ये काटा चोरू नये. तालुक्यामध्ये उसाची सरासरी रिकव्हरी 11 पेक्षा जास्त होईल असा अंदाज आमदार मुरकुटे यांनी व्यक्त  केला.
त्यामुळे दोन्ही कारखान्यांनी मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात पहिला हप्ता 2800-3000 रुपये जाहीर करावा. खाजगी कारखान्याच्या स्पर्धेमध्ये सहकारी कारखान्यानी भाव जाहीर के ला नाही तर सहकारी क्षेत्राचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात या क्षेत्रात खाजगी कारखाने शिरकाव करतील असा इशाराही त्यांनी दिला.