Breaking News

सुसंस्कृत राजकारण हे संगमनेर तालुक्याची समृद्ध परंपरा - आ. थोरात

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - सतत विकास कामांचा ध्यास घेवून तालुक्यातील वाडी-वस्तीवर विकासाच्या विविध योजना आपण सातत्याने राबविल्या  आहेत. पहिल्या टप्प्यात झालेल्या 38 ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक पातळीवर आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या निवडणूकामुळे जय पराजय हा होतच  असतो. सर्वांनी मतभेद विसरुन गावच्या विकासासाठी एकत्र यावे. सुसंस्कृत राजकारणाची तालुक्याची समृध्द परंपरा आहे, असे प्रतिपादन माजी  महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
 शिवाजीनगर येथील सुदर्शन निवासस्थानी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत रणजितसिंह देशमुख, अजय  फटांगरे, अमित पंडित, नवनाथ अरगडे, अ‍ॅड. अशोक हजारे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, नानासाहेब गुंजाळ, दशरथ वर्पे, प्रभाकर कांदळकर, खराडीचे वसंत  साबळे, खेमचंद निहलानी, नामदेव गुंजाळ, विलास कवडे,बापू गिरी आदी उपस्थित होते. यावेळी कोळवाडे, खराडी, तळेगाव दिघे, वाघापूर येथील  नवनिर्वाचीत सरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
आ. थोरात म्हणाले, की निवडणुका या लोकशाहीचा पाया आहे. संगमनेर तालुक्यात एक कुटुंब एक परिवार म्हणून सगळेजण काम करत आहेत. या  निवडणूकीत आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या. देशात सध्या भाजपाचे सरकार असून ही संगमनेर तालुका मात्र कायम  काँग्रेसच्या विचारांशी बांधिल राहिला आहे. एकजूट व पक्ष संघटना, कार्यकर्त्यांची मोठी फळी ही आपली ताकद आहे. आपण सातत्याने तालुक्यात   विकासकामे केली आहेत. सहकारी संस्थांच्या उत्तम कारभारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. संगमनेर शहर हे सुरक्षीत व सुसंस्कृत शैक्षणिक  केंद्र म्हणून राज्यात नावारुपास आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी झाले गेले विसरुन गावच्या व तालुक्याच्या विकासात योगदान द्यावे. सुसंस्कृत  राजकारणाची परंपरा यापुढे ही सर्वांनी जपावी. मात्र तालुक्याच्या अस्मितेसाठी आपआपसातील मतभेद विसरुन एकत्र रहावे, असे अवाहन त्यांनी यावेळी  केले. यावेळी आ. थोरात समर्थकांनी फटाक्यांची आतिशबाजी व गुलालाची उधळण करुन विजयी उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.