Breaking News

कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव

नाशिक, १० ऑक्टोबर - लासलगाव, उमराणे, सटाणा बाजार समितीत कांद्याच्या भाव ५०० ते ७०० रुपयांनी वधारले. लवकरच कांदा तीन हजारांचा टप्पा गाठणार असून शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.लासलगाव बाजार समितीत आज उन्हाळ कांदा आवक ८०० ट्रैक्टर/ पिकअप होऊन किमान १२०० रूपये ते कमाल २७३१ व सरासरी भाव २४५१ प्रतिक्विंटल होते.
लासलगांव बाजार समितीत २१४८७ क्विंटल कांद्याची आवक होती. सर्वाधिक दर २७३१ रुपये होते तर सटाण्यात २९०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने साठवलेला कांदा शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणणार असल्याने येणाऱ्या काळात काहीश्या प्रमाणात आवक वाढू शकते.
पुढील महिन्यापासून पावसाळी कांदा निघायला सुरुवात होणार असल्यामुळे उन्हाळ कांदा विक्री वाढणार आहे. आवक वाढली तर भाव थोड्याफार प्रमाणात खाली येण्याचीही शक्यता तन्ज्ञाकडून व्यक्त केली जाते आहे.
पावसामुळे कर्नाटकमधील नवीन कांदा खराब निघाल्यामुळे इतर राज्यात जाणार कर्नाटकचा कांदा कमी झाल्याने परिणामी लासलगाव कांदा बाजार समितीतील कांद्याला मागणी वाढत कांद्याचा भाव देखील वाढल्याचे दिसत आहे. पावसाने गुजरातमधील कांदा खराब झाला आहे.
तर मध्यप्रदेश राज्यातील कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून ८०० रूपये प्रतिक्विंटल दराने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे मध्यप्रदेशातून या कालावधीमध्ये इतर राज्यात जाणारा कांदा रवाना झाला नाही. कांद्याच्या भावात तेजी दिसत असली तरी गेल्या सहा सात महिन्यांपासून साठवणूक केलेला कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहे.