Breaking News

अच्छे दिनच्या शोधात काळोख चिवडण्याची वेळ

दि. 08, ऑक्टोबर - दिव्याखाली किंवा बुडा खाली अंधार अशी आपल्याकडे एक प्रचलित म्हण आहे.स्वतःचा बेजबाबदारपणा,कर्तव्यशुन्यता लपविणार्या प्रवृत्ती  जेंव्हा उघड्या पडतात,तेंव्हा या प्रवृत्तींचं समग्र वर्णन करण्यासाठी या म्हणीचा वापर केला जातो.कधी कधी या प्रवृत्तींचं कर्तृत्व इतकं हिणकस असतं की या म्हणीत  वापरलेले शालीन शब्द हार पत्करतात.आपल्या राजकर्त्या प्रवृत्तींचं वर्णनही याच शब्दकुळीत मोडणारे आहे.
उडदामाजी काळे गोरे काय निवडावे या चालीवर सत्ताधारी आणि विरोधक कुणालाही कर्तृत्वाच्या पातळीवर वेगवेगळे मापदंड लावता येणार नाहीत.गेल्या सत्तर वर्षात  या राजकीय पक्षांनी एकाने  मारायचे,एकाने बोंबलायचे हे धोरण राबवून जनतेला वेड्यात काढण्याचे धोरण स्वीकारले आहे.सरकार कुठलेही असले तरी जनतेच्या  मुलभूत प्रश्‍नांना उत्तरे शोधण्याची मानसिकता कुठल्याच राजकीय पक्षात अथवा नेत्यात दिसली नाही ,आजही दिसत नाही.सुधारणांच्या नावावर निवडणूक काळात  जनतेला भुलथापा देऊन,वेगवेगळी प्रलोभने दाखवून मतांचा जोगवा पदारात पाडून घेतला.जनतेच्या छाताडावर नाचत नाचत सत्ता राबवली.या प्रक्रियेत सहभागी  जवळपास सर्वच राजकीय पक्ष या पातळीवर जनतेचे अक्षम्य गुन्हेगार ठरले आहेत.
ही बाब लक्षात यायला सत्तर वर्षाची प्रतिक्षा करावी लागली.
स्वातंञ्य मिळाल्यापासून सत्तर वर्षाच्या कालखंडात सर्वाधिक काळ सत्ता भोगण्याचे सौभाग्य लाभलेली काँग्रेस जनतेच्या नजरेत खलनायक ठरू पहात असतांना नेमकी  संधी साधून आजच्या सत्ताधारी भाजपाने जनतेला अच्छे दिनचे स्वप्न दाखवण्यास सुरूवात केली.खरंतर अच्छे दिनचे ठेकेदार म्हणविणार्या विद्यमान सरकारचा  आजचा एकूण कारभार पाहिल्यानंतर या भुलथापाच होत्या.याची जाणीव पहिल्या तीन वर्षातच त्यांच्या कारभाराने करून दिली.दगड विटांची तुलना सध्या सुरू  आहे.जनतेच्या दृष्टीने नालायक ठरलेली काँग्रेस दगडापेक्षा मऊ असलेली वीट वाटू लागली आहे.कमळ का फूल,जीवन की भूल अशी नारेबाजी आता ऐकायला येत  आहेत.यातून अर्थ काढायला फार मोठ्या राजकीत तत्ववेत्याची गरज नाही.विद्यमान सरकारच्या ध्येयधोरणांवर ,निर्णयांवर जनता नाराज आहे,आपला असंतोष अशी  नारेबाजी करून वेगवेगळ्या पातळीवरून व्यक्त करू लागली आहे.एव्हढा साधा सरळ अर्थ आहे.
अच्छे दिन लायेंगे ही भुल होती.ती आता ओसरू लागली आहे.इंधन दरवाढीच्या वणव्यात उडालेला महागाईचा भडका अच्छे दिनची आणखी प्रतिक्षा करण्याची क्षमता  हिरावून घेत आहे.अच्छे दिनच्या शोधात भटकंती करणारी जनता भारनियमनाच्या अंधारात चेंगरली जात आहे.दुसर्या बाजूला किड्यामुंग्यांना मारणारे औषध नरसंहार  करू लागले आहे.जनतेने ज्यांना समाजाच्या क्षितिजावर तळपळणारे चंद्र सुर्यच समजले तेच अंधाराला फितूर होऊ लागल्याने अच्छे दिनच्या शोधात निघालेल्या  जनतेवर कर्तव्य प्रतारणेचा काळोख चिवडण्याची वेळ आली आहे.