लातुर तालुक्यातील अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
लातूर, दि. 11, ऑक्टोबर - लातूर तालुक्यात यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत 43 ग्रामपंचायतींच्या 252 सदस्यांपैकी 152 सदस्य भाजपाचे निवडून आले असा दावा करण्यात आला. ग्रामीण मतदारसंघातील या निवडणुकीसाठी आ. त्र्यंबक भिसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. जनतेतून थेट सरपंच निवडण्याची ही पद्धती चांगली आहे. याचा गावालाही चांगला लाभ होईल अशी चर्चा मतदारांत आहे. पिंपरीच्या सरपंचपदी सौ पूनम श्रीकांत भिसे निवडून आल्या आहेत. जसजसे निकाल घोषित होत होते तसतसे मतमोजणी केंद्राबाहेरचा जल्लोष वाढत होता. लातुरात फार वेळ न दवडता आपापल्या गावात जाऊन आनंद साजरा करण्याकडे सगळ्यांचा कल होता दुपारी एक वाजेपर्यंत लातुरातील मतमोजणी संपली पण पुढील सोपस्काराला बराच वेळ लागलानिवडणूक निकालाचा अधिकृत कागद बाहेर यायला सात वाजले. लातूर तालुक्यात 43 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात 76 टक्के मतदान झाले. एकूण 94 हजार 312 मतदारांपैकी 71 हजार 679 जणांनी मतदान केले. जिल्ह्यात 351 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यापैकी 18 ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. या निवडणुकीसाठी 1145 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. 1515 पोलीस तैनात करण्यात आले होते. 72 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती.