Breaking News

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सूतगिरण्या अडचणीत

सांगली, दि, 12, ऑक्टोबर - वाढीव वीजदर व सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्या अडचणीत आल्या आहेत. या प्रश्‍नाबाबत सरकारने योग्य धोरण न अवलं बिल्यास सहकारी सूतगिरण्या बंद करणाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे संस्थापक व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी दिला.
पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांचे संस्थापक, अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्या आष्टा येथे आयोजित बैठकीत अण्णासाहेब डांगे बोलत होते. राज्यात पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक  वीजदर आहे. सरकारकडून पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकारी सूतगिरण्यांबाबत जाणीवपूर्वक पक्षपात केला जातो. सहकारी सूतगिरण्यांना सद्यस्थितीत कर्ज फेडणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे  सरकारने सहकारी सूतगिरण्यांचे कर्ज माफ करावे, वीज दरात सवलत द्यावी, कापूस खरेदीवर अनुदान द्यावे, पूरक व्यवसायासाठी भागभांडवल द्यावे, सूत दराबाबत समिती नियुक्त करावी व  वीज दर सर्वत्र एकसारखा करावा आदी मागण्या डांगे यांनी केल्या.
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी म्हणाले, की राज्य शासन हा व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याविरोधात आवाज उठविण्याची गरज आहे. या  लढ्याचे नेतृत्व अण्णासाहेब डांगे यांनी करावे, अशी सूचना मांडली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी अण्णासाहेब डांगे यांच्या नेतृत्वाखाली आपण  सर्वजण ही लढाई लढूया. त्यात यश नक्की मिळेल, असा विश्‍वास व्यक्त करून सहकारी सूतगिरण्यांसमोरील अडचणींबाबत मुख्यमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री व सहकार मंत्री यांची भेट घेऊन  मागण्या व ठोस निर्णयाबाबत चर्चा करूया, अशी भूमिका मांडली.
भारतीय जनता पक्षाचे सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी सहकारी सूतगिरण्यांसमोरील अडचणींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून  आपल्या मागण्या व प्रश्‍न मिटविले पाहिजेत, अशी सूचना केली. या बैठकीत राहुल आवाडे, श्रीमती किशोरी आवाडे, दत्तात्रय कुराडे, ए. बी. चालुक्य, बाबासाहेब वडिंगे, जे. बी. दिवटे व  नंदकुमार माने यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी दीनदयाळ मागासवर्गीय सूतगिरणीचे मुख्य कार्यकारी संचालक चिमण डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.