Breaking News

कोकणात नारळाचे उत्पादन घटले, दरात मोठी वाढ

रत्नागिरी, दि. 01, नोव्हेंबर -  केरळमधून होणारी आवक आणि स्थानिक उत्पादन घटल्यामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारात नारळाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत  असून नारळाच्या दराने पंचविशी गाठली आहे. धार्मिक कार्ये, नवरात्रोत्सव आणि दिवाळी या पार्श्‍वभूमीवर बाजारात मागणी मोठी आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती उद्भवल्याने  नारळाच्या दरात वाढ झाली आहे.
कोकणात मोठ्या प्रमाणात आहारात नारळाचा वापर केला जातो. त्याच बरोबर सणासुदीला धार्मिक कामांसाठी नारळाला मोठी मागणी असते. नवरात्रोत्सवात नारळाचे दर गगनाला  भिडले होते. या परिस्थितीतही नारळाची खरेदी झाली. बाजारात दहा ते पंधरा रुपयाला विकले जाणारे नारळ आता वीस ते पंचवीस रुपयाला विकले जात आहेत. त्यामुळे  सर्वसामान्य ग्राहकांना नारळ दुर्मिळ होऊ लागला आहे.
गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे नारळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ‘इरिओफाइट माइट’ या रोगाचा प्रादुर्भाव नारळावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हा क ोळी फळामधला रस शोषून घेतो. त्यामुळे परिपक्व होण्याआधीच नारळ गळून पडतात. नारळाचा आकारही लहान होतो. त्याच्या पृष्ठाभागावर सुरकुत्या निर्माण होतात. यामुळे मोठ्या  प्रमाणात उत्पादनात घट झाली. अनेक ठिकाणी लाल तोंडाच्या माकडांच्या धाडी नारळावर पडत आहेत. माकडे कोवळे नारळ पोखरून खातात. त्यांचा बंदोबस्त करणे  बागायतदारांच्या आवाक्याबाहेरचे आहे. स्थानिक बागायतदारांकडून नेहमीच्या तुलनेत नारळ उपलब्ध होत नाहीत, तसेच माकडे आणि मोबाइल टॉवरच्या परिणामामुळे नारळाचे  उत्पादन घटल्याचे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिल्यास नारळाचा दर तीस रुपयांच्यावर जाण्याची शक्यता आहे. नारळ बारमाही पीक असल्याने कोक णी माणसाच्या आहारातील तो महत्त्वाचा घटक आहे. नारळाशिवाय त्याच्या जेवणाला पूर्णत्व नाही. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत विक्री होणारा बहुतांश नारळ दररोजच्या वापरासाठी  स्थानिकच खरेदी करतात. कोकणातील नारळाची निर्यात होत नाही. लहान बागायतदार शहराच्या आठवडा बाजारात जाऊन किरकोळ आणि घाऊक विक्री करतात. स्थानिक  व्यापारी त्याची जिल्ह्याच्या अन्य भागांत विक्री करतात. मोठे नारळ बागायतदार घाऊक पद्धतीने विक्री करतात.
शाश्‍वत बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे कोकणातील नारळ बागायती धोक्यात आली आहे. काजूचे पीक कमी देखभालीत चांगला फायदा देऊ लागल्याने बागायतदार  पारंपरिक नारळ बागायतीपासून दूर होऊ लागल्याचे चित्र आहे. यामुळे पुढच्या काळात ‘नारळ-पोफळींच्या बागांमधील कोकण’ ही ओळख चित्रपटांपूर्ती मर्यादित राहण्याची भीती  व्यक्त होत आहे. शाश्‍वत पीक म्हणून असलेली नारळाची ओळख हरवू लागली आहे. वाढत्या उत्पादनखर्चामुळे नारळाचे आर्थिक गणित बसवणे कठीण बनले आहे. यातच गेल्या दोन  वर्षांत काजूचा प्रतिकिलो दर सर्वसाधारण पन्नास-साठवरून दीडशेपर्यंत पोहोचला आहे. काजूला फारशी मेहनत करावी लागत नाही. उत्पन्नही चांगले मिळत असल्याने अनेक  बागायतदार नारळाऐवजी काजू पिकाकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.