Breaking News

महाराष्ट्र पोलिसांचा क्रीडा फंड तीन कोटी करणार- मुख्यमंत्री

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - खेळ हा केवळ मनोरंजनाचा भाग नाही तर यामुळे सांघिक भावना वाढीस लागते. महाराष्ट्र पोलिसांची क्रीडा क्षेत्रात कामगिरी उंचावली असून महाराष्ट्र  पोलीसांचा क्रीडा फंड वाढवून तीन कोटी करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
एसआरपीएफ गट दोनच्या संकुलात 66 व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशीप स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते  बोलत होते.
फडणवीस म्हणाले, खेळ हा केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते. या स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील सर्व राज्यातील खेळाडू या ठिकाणी  उपस्थित असल्याने खर्‍या अर्थाने या ठिकाणी संपर्ण देश एकवटला आहे. महाराष्ट्र पोलीसांनी अत्यंत चांगल्या प्रकारे स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत  सहभाग घेतल्याने या स्पर्धेची उंची वाढली आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्र पोलिसांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उंचावली आहे. प्रत्येक क्रीडा प्रकारात त्यांनी चांगल्या प्रकारे खेळ केला आहे, अनेक पदके त्यांनी जिंकली आहेत.  महाराष्ट्र पोलिसांतील चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांचा क्रीडा फंड एक कोटी रुपयांवरुन तीन कोटी रूपयांचा करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र पो लिसांना सिंथॅटीक मैदानासाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पोलिसांच्या बँड पथकाने उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी महाराष्ट्र पोलीस आणि प्रो-कबड्डी संघात प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. या  सामन्यानंतर आसाम आणि नागालँडच्या कलाकरांचा पारंपारिक नृत्याचा कार्यक्रम पार पडला. मनोरंजनाच्या कार्यक्रमानंतर सर्व संघांचे संचलन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व  इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना व संघांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.