Breaking News

शासनाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या सहकारी दूध संघांवर कारवाई करणार - महादेव जानकर

मुंबई, दि. 05, ऑक्टोबर - दूध उत्पादकांसाठी शासनाने 21 जून 2017 पासून 3 रुपये प्रति लीटर दूध दरवाढ लागू केली होती. परंतु अद्यापही काही सहकारी  दूध संघांनी दरवाढ लागू केलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश  देण्यात आले आहे,असा इशारा पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिला आहे.
दूध दरवाढसंबंधी सहकारी दूध संघांनी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात मंत्री श्री. जानकर यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
मंत्री श्री.जानकर यांनी सांगितले, 21 जून 2017 पासून गायीचे दूध 27 रू तर म्हशीचे दूध 36 रु प्रती लि. अशी एकूण 3 रु. वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे  याचा ग्राहकांवर बोजा देण्यात आला नव्हता. तरी काही दूध उत्पादक संघांनी ही दरवाढ अजुनही लागू केली नाही. यापूर्वीही अशा दूध संघांना नोटीस पाठविण्यात  आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात असे आढळून आले आहे, ज्या दूध संघांनी दरवाढ केली होती त्यांनी पुन्हा दर कमी केले आहेत. प्राप्त तक्रारींनुसार काही सहकारी दूध संघ ठरविलेल्या  दरानुसार दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध दर देत नसल्याने, शासनाच्या आदेशाचे पालन न करणार्‍या अशा सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश  देण्यात आले असल्याचे श्री. जानकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.