Breaking News

राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढू दे, विठ्ठल चरणी महसूलमंत्र्यांचे साकडे

सोलापूर, दि. 01, नोव्हेंबर - कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत विठ्ठलाची  पूजा करण्याचा यंदाचा मान कर्नाटकमधील बळीराम शेवु चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या वारकरी दाम्पत्याला मिळाला.
कार्तिकी यात्रेच्या सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळत आहे. राज्यातील शेतकर्‍यांचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची  क्षमता वाढू दे, असे साकडे विठ्ठलाला घातल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सत्कार क रण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अधिकारी, पोलीस अधीक्षक एस. विरेश प्रभु यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, महसूल प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेचे मानाचे वारकरी बनण्याचा मान बळीराम शेवु चव्हाण (वय 40) व शिनाबाई बळीराम चव्हाण (वय 35, रा.हडगल्ली, ता. जि. विजापूर) यांना मिळाला. यावेळी बळीराम  चव्हाण यांनी सांगितले की, मी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात वाहक आहे. गेली 6 वर्षे पंढरपूरची वारी करतो. महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ कर्मचारी बंधूंना चांगल्या पद्धतीने  वेतन मिळावे, तसेच त्यांच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात असे विठ्ठल चरणी साकडे घातले असल्याचेही बळीराम चव्हाण यांनी सांगितले.