Breaking News

सांगली जिल्ह्यातील 39 टोळ्यांना मोक्का लावणार

सांगली, दि. 13, ऑक्टोबर - सांगली जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीलालण्यासाठी सांगली जिल्हा पोलिस दलाकडून सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. त्या अनुषंगाने अवैध  व्यावसायिक, गुन्हेगारी टोळ्या व मारामारी अशा गंभीर गुन्ह्यात सहभागी असणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी  लवकरच सांगली जिल्ह्यातील 39 टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महा निरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांनी दिली.
वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा पोलिस दलाकडून ठोस पाऊल उचलले जात आहे. गुन्हेगारी टोळ्यांची  पाळेमुळे नष्ट करण्याचे काम सुरू आहे. या गुन्हेगारी टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दत्तात्रय शिंदे यांनी मटका व्यवसायातील तब्बल 153 जणांवर तडीपारीची  कारवाई केली आहे. कोल्हापूर परिक्षेत्रात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर कारवाई झाली आहे. नुकतेच तीन टोळ्यातील 38 जणांना तडीपार केले  आहे.
मोक्कातर्ंगत कारवाई करण्यासाठी आता आणखी 39 टोळ्यांचा प्रस्ताव आला आहे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील या टोळ्यांवर मोक्कातर्ंगत कारवाई केली जाणार आहे. काही  दिवसापूर्वी झालेल्या शकील मकानदार खूनप्रकरणी माजी नगरसेवक सचिन सावंत याचे नाव आल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकरणात कोणाचीही गय केली  जाणार नाही. अनेक टोळ्यांकडून गुन्ह्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे.
या अल्पवयीन गुन्हेगारात सुधारणा करण्यासाठी युथ पार्लमेंटरी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातर्ंगत कोल्हापूर परिक्षेत्रात विविध स्पर्धा घेण्यासाठी पोलिस महासंचालक  यांनी 35 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय मुली- महिलांची छेडछाड करणा-या 18 हजार 129 जणांवर निर्भया पथकाने कारवाई केली असून त्यात सांगली  जिल्ह्यातील चार हजार 739 जणांचा समावेश असल्याचेही विश्‍वास नांगरे- पाटील यांनी सांगितले.