Breaking News

राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा 3,215 रूपये अंतिम दर जाहीर

सांगली, दि. 08, ऑक्टोबर - राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने सन 2016- 17 या गळीत हंगामात गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन तीन हजार  215 रूपये अंतिम दर जाहीर केला आहे. यापूर्वी या रकमेपोटी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकर्यांना दोन हजार 940 रूपये अदा केले आहेत. यंदा  दीपावलीनिमित्त विनाकपात प्रतिटन 275 रूपये इतक्या अंतिम हप्त्यापोटी सुमारे 36 कोटी 61 लाख रूपयांची रक्कम सोमवार 9 ऑक्टोबर रोजी संबंधित ऊस  उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार असल्याची माहिती साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
साखर कारखाना कार्यस्थळावरील विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत पी. आर. पाटील यांनी या अंतिम ऊसदराची घोषणा केली. या पत्रकार बैठकीस साखर  कारखान्याचे संचालक दादासो मोरे, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, चीफ अकौंटट अमोल पाटील, सचिव प्रताप पाटील, व्ही. बी. पाटील व जयकर फसाले  आदी उपस्थित होते. साखर कारखाना सभासदांना दर महिन्यास दिल्या जाणा-या साखरेत दोन किलोने वाढ करण्यात आली असून यंदा ऑक्टोबर महिन्यापासून  पाचऐवजी सात किलो साखर अवघ्या दोन रूपये प्रतिकिलो दराने देण्यात येणार असल्याचेही पी. आर. पाटील यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या  साखराळे, वाटेगाव- सुरूल व कारंदवाडी (ता. मिरज) या तीनही युनिटमध्ये गत 2016- 17 च्या गळीत हंगामात 13 लाख 31 हजार 295 मेट्रिक टन ऊसाचे  गाळप करण्यात आले होते. त्यात साखराळे युनिटमध्ये पाच लाख 70 हजार 372 मेट्रिक टन, वाटेगाव- सुरूल युनिटमध्ये चार लाख सहा हजार 839 मेट्रिक टन,  तर कारंदवाडी युनिटमध्ये तीन लाख 54 हजार 82 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले गेले.
या ऊसाची एङ्गआरपीनुसार या तीनही युनिटची रक्कम साखर उतार्यानुसार वेगवेगळी होते. त्यात साखराळे युनिटसाठी 2590 रूपये 36 पैसे, वाटेगाव- सुरूल  युनिटसाठी 2568 रूपये 24 पैसे, तर कारंदवाडी युनिटसाठी 2614 रूपये 9 पैसे प्रति मेट्रिक टन आहे. या तीनही युनिटचे कार्यक्षेत्र एकच असल्याने या तीनही  युनिटमध्ये सर्वाधिक असणारी कारंदवाडी युनिटची एङ्गआरपी सर्वच युनिटना धरली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी एङ्गआरपी  अधिक 175 रूपये असा फॉर्म्युला स्वीकारला असल्याने गळीतास आलेल्या ऊसाला राजारामबापू पाटील साखर कारखान्याने प्रतिटन 2790 रूपयांचा पहिला हप्ता  दिला होता. पावसाळ्यात शेतक-यांना शेती मशागत, बी- बियाणे व खतासाठी दुसर्या हप्त्यापोटी प्रतिटन 150 रूपये अदा केले आहेत.
उत्पादित केलेल्या साखरेस मिळालेल्या दरावर संचालक मंडळाने प्रतिटन 275 रूपये असा हप्ता मंजूर केला आहे. त्यापोटीची 36 कोटी 61 लाख रूपयांची रक्कम  दि. 9 ऑक्टोबर रोजी संबंधित ऊस उत्पादक शेतकर्याच्या बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे. या रकमेतून येणे बाकी घेतली जाईल. मात्र कोणतीही कपात केली  जाणार नाही. साखर कारखाना सभासदांच्या भावना जाणून घेऊन जयंत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार सभासदांना दिल्या जाणार्या प्रतिमहिना पाच किलो  साखरेत वाढ करून ती प्रतिमहिना सात किलो केली आहे. या साखरेचा दर प्रतिकिलो दोन रूपये इतकाच राहणार आहे.
राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या या तीनही युनिटकडील नवीन हंगाम घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार दि. 1 नोव्हेंबर रोजी  साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरूल व कारंदवाडी या तीनही युनिटमध्ये गळीत हंगाम सुरू करण्याचा मानस आहे. साखराळे युनिटमध्ये दहा लाख 50  हजार मेट्रिक टन, वाटेगाव- सुरूल युनिटमध्ये पाच लाख 50 हजार, तर कारंदवाडी युनिटमध्ये चार लाख 50 हजार मेट्रिक टन असे एकूण यंदा 20 लाख 50  हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ऊस उत्पादक सभासद अथवा बिगर सभासदांनी आपला पिकविलेला ऊस साखर कारखान्यास घालून ऊस  गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही पी. आर. पाटील यांनी केले.