Breaking News

30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रवादीचे आंदोलन - तटकरे

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - तीन वर्षाचा कालावधी पूर्ण करणार्‍या कृतीशून्य सरकारच्या विरोधात 30 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार  आहे. या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवणार असून 8 नोव्हेंबरला नोटा रद्दचे वर्षश्राद्ध घालण्यात येणार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार प रिषदेत सांगितले.
भाजपचे तीन साल, महाराष्ट्र बेहाल’ अशी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारी माहिती पुस्तिकाही आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वितरीत केली. यामध्ये सरकारकडून तीन वर्षात  झालेल्या जनतेच्या भ्रमनिरासाचे वर्णन करण्यात आले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना आणि टीव्हीवर चाललेली मुख्यमंत्र्यांची जाहिरात पाहिली, त्यात त्यांनी  ’प्रामाणिक’ कर्जमाफी असा शब्द वापरला आहे. या शब्दापुढे ॠअ’ लावावा, अशी कर्जमाफीची परिस्थिती असल्याची टीका श्री. तटकरे यांनी केली.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर बोलताना या सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे सांगितले. शेतकर्‍यांना ही दिवाळी चांगली जाईल असे वाटत होते. परंतु शेतक-यांची  दिवाळी अंधारातच गेली आहे. एकीकडे कर्जमाफीचे गाजर आणि दुसरीकडे विजेचा धक्का देण्यात हे सरकार यशस्वी ठरले असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
या सरकारचे राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी कोणतेही काम नाही. महिलांच्या हिताचे एकही काम या सरकारने केलेले नाही. या राज्यात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढतच  चालले आहे. कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशी देण्याचे जाहीर केले मात्र त्याचा निर्णय अद्याप नाही. या राज्यात कायद्याचा धाक राहिलेला नाही, असा आरोपही तटकरे यांनी केला.