Breaking News

पगारातील 20 टक्के रक्कम गोरगरिबांसाठी खर्च करणारा व्यावसायिक

रत्नागिरी, दि. 01, नोव्हेंबर - सामाजिक काम करण्यासाठी इच्छाशक्तीची जोड असेल तर ते सहज साध्य होऊ शकते, याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे मूळचे सांडेलावगण (ता.  रत्नागिरी) येथील तरुण संदीप लक्ष्मण पाष्टे. पगारातील विशिष्ट रक्कम बाजूला काढून तिचा उपयोग उपेक्षित आणि गरजूंसाठी करण्याचा उपक्रम गेली काही वर्षे ते करत आहेत.  मुंबईत वास्तव्याला असलेले पाष्टे यांनी यावर्षी दिवाळीत रत्नागिरीतील ‘माहेर’ संस्थेतील प्रवेशितांना दिवाळी फराळ दिला. तसेच मुंबईतील झोपडपट्टीत राहणा-या काही गरजू  विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी जमविलेल्या निधीचा उपयोग करत तरुणांपुढे आदर्श घालून दिला आहे.
पाष्टे यांचे मूळ गाव सांडेलावगण (ता. रत्नागिरी) आहे. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या संदीप यांच्यावर वडिलांच्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक काम करण्याचा चांगलाच  प्रभाव आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून संदीप विविध कार्यक्रमात सहभागी झाले होते. गरिबीत काढलेले दिवस आठवत आणि गरिबीची जाणीव ठेवून घेतलेल्या शिक्षणातून  पाष्टे नोकरीला लागले. नोकरीचा व्याप सांभाळत त्यांनी व्यवसायाकडे पावले वळविली. सध्या गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांचा व्यवसाय चालतो. त्यातूनच आपल्या मिळकतीतील  सुमारे 20 टक्के पैसे सामाजिक कार्यासाठी किंवा गरजू व्यक्तींना व्हावा, या उद्देशाने काही पावले उचलली. त्यातूनच गेली तीन वर्षे निःस्वार्थीपणाने दर तीन महिन्याला वेगवेगळ्या  गरजवंतांना मदत म्हणून देतात. शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय अशा प्रकारचे साह्य ते करत आले आहेत. रत्नागिरीतील माहेर या संस्थेतील मुलांना दर दिवाळीत फराळ देतात.  मुंबईतील आदिवासी पाड्यातून वेगवेगळी आर्थिक आणि त्याचबरोबर फराळ, खाऊ वाटप करण्यात आले. स्वतः शिकलेल्या सांडेलावगण शाळेतल्या तसेच रत्नागिरी कुवारबाव  येथील झोपडपट्टीतील मुलांना शालेय साहित्य, वह्या, पट्टी, पेन्सिल, वाचनीय पुस्तके भेट म्हणून दिली आहेत. या विविध सामाजिक कामांद्वारे त्यांनी युवकांसमोर आदर्श निर्माण केला  आहे.