Breaking News

निवृत्तीवेतन धारकांनी 15 नोव्हेंबरपूर्वी हयातीचा दाखला संबंधित बँकेत देणे आवश्यक- सुशिलकुमार केंबळे

सांगली, दि. 28, ऑक्टोबर - सांगली जिल्हा कोषागारावरती निवृत्तीवेतन आधारित करणार्‍या सर्व राज्य शासकीय व इतर राज्यांच्या निवृत्तीवेतन धारकांनी 1 नोव्हेंबर  रोजी हयात असल्याबाबतचा हयातीचा दाखला 15 नोव्हेंबर 2017 पूर्वी संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात संबंधीत बँकेकडे निवृत्तीवेतन धारकांची  एकत्रित हयातीच्या दाखल्याची प्रमाणपत्र यादी पाठविण्यात आली आहे. निवृत्तीवेतन धारकांनी हयातीच्या प्रमाणपत्र यादीवर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. तरी संबंधित  निवृत्तीवेतन धारकांनी यादीमधील त्यांचे नाव आणि खाते क्रमांक समोरील रकान्यात स्वाक्षरी करुन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार  केंबळे यांनी केले आहे.केंबळे म्हणाले, हयातीचा दाखला एकत्रित प्रमाणपत्र यादीत स्वाक्षरी केल्यानंतर पुन्हा स्वतंत्र, वैयक्तिक हयातीचा दाखला देण्यात येऊ नये.  हयातीचा दाखला एकत्रित प्रमाणपत्र यादीत स्वाक्षरी नसल्यास निवृत्तीवेतन धारकांचे माहे डिसेंबर 2017 पासून निवृत्तीवेतन हयातीचा दाखला प्राप्त होईपर्यंत स्थगित  ठेवण्यात येईल.
संगणकीय व्यवस्थेव्दारे हयातीचे दाखले स्विकारण्याची योजना कार्यान्वीत केली असून त्यासाठी शासनाने जीवनप्रमाण या नावाने वेब पोर्टल तयार केले आहे. त्यामध्ये  हयातीचा दाखला ऑनलाईन पध्दतीने रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा जिल्हा कोषागार कार्यालय व तालुका स्तरावर  रजिस्ट्रेशन करण्यासाठी सेतू सुविधा केंद्र उपकोषागार कार्यालय व जेथून निवृत्ती वेतन घेतले जाते त्या बँकेत उपलब्ध केलेली आहे. जीवन प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन करणे  निवृत्ती वेतन धारकांना अनिवार्य आहे. यासाठी आधार कार्डची छायांकित प्रत अथवा नंबर, पी.पी.ओ. क्रमांक, मोबाईल (स्वत:जवळ असणे आवश्यक), बँक, शाखा व  खाते क्रमांकाचा तपशील (बँक पासबुक) ही कागदपत्रे घेऊन जाणे अनिवार्य आहे. तरी सर्व निवृत्ती वेतनधारकांनी पूर्वीच्या पध्दतीने बँकेत स्वाक्षरी सुध्दा करावी व  ऑनलाईन हयातीचा दाखला सुध्दा नोंदणीकृत करावा, असे आवाहनही केंबळे यांनी केले आहे.