Breaking News

शालेय पोषण आहाराचा बहुप्रतिक्षित 14 कोटींचा निधी प्राप्त

औरंगाबाद, दि. 07, ऑक्टोबर - चार महिन्यांपासून प्रतीक्षा असलेला शालेय पोषण आहाराचा निधी अखेर जिल्हा परिषदेस प्राप्त झाला आहे. झेडपी प्रशासनास नुकतेच 14 कोटी रुपये प्राप्त झाले असून, त्यामुळे मुख्याध्यापकांची मोठी अडचण दूर होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने सर्व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. यासाठी शाळांना सरकारकडून ठराविक पद्धतीने निधी मिळतो. विद्यार्थ्यांची संख्या, त्यासाठी लागणारे धान्य, धान्यादी, भाजीपाला, बचतगटाचे अनुदान याची माहिती एकत्रित संकलित झाल्यानंतर दरमहा लागणारा निधी अ‍ॅडव्हान्स देणे अपेक्षित आहे. पण अनेक वेळा दप्तरदिरंगाईमुळे शालेय पोषण आहाराचे अनुदान सहा-सहा महिने येत नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांची परवड होऊ नये, यासाठी मुख्याध्यापक प्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसे टाकून पोषण आहाराची अडचण दूर करतात. औरंगाबाद जिल्ह्यासाठी लागणारा निधी सहा महिन्यांपासून प्रलंबित होता. त्यातील 14 कोटींचा निधी नुकताच शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याचे शालेय पोषण आहार विभागाचे लेखाधिकारी राजकुमार खाजेकर यांनी सांगितले.