Breaking News

भाजपच्या पराभवासाठी काम करणार : हार्दिक पटेल

नवी दिल्ली, दि. 22, ऑक्टोबर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमध्ये रोज नवीन नाट्यमय घटना घडत आहेत. काल पटेल आरक्षण  आंदोलनातील हार्दिक पटेलचे महत्त्वाचे सहकारी वरुण आणि रेश्मा पटेल यांनी भाजपत प्रवेश केला. वरुण आणि रेश्माच्या भाजप प्रवेशाने हार्दिक पटेलने  भाजपविरोधातील भूमिका अजून तीव्र केली आहे.
खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हार्दिक पटेलने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. शिवाय, काँग्रेसकडून राजकारणाच्या ऑफरवरही भाष्य केलं  आहे. हार्दिक पटेल म्हणाला की, काँग्रेसने मला राजकारणात येण्याचे आमंत्रण दिले होते. पण मी राजकारणात येणार नाही. तर भाजपचा पराभव  करण्यासाठी काम करणार आहे. हार्दिक पटेलने भाजपवरील आपला राग व्यक्त करताना काँग्रेसचे कौतुक केले आहे. भाजपपेक्षा काँग्रेस चांगला पक्ष  असल्याचे सांगून काँग्रेसमध्येच खर्‍या अर्थानं लोकशाही रुजली असल्याचे मत हार्दिक पटेलने मांडले आहे.
याशिवाय वरुण आणि रेश्मा पटेल यांच्या भाजप प्रवेशावरुनही तिखट प्रतिक्रियाही दिली असून, वरुण आणि रेश्मा पटेल हे दोघेही गद्दार असून, कालपर्यंत  ते भाजपला शिव्या घालत होते. आता त्यांना भाजपने विकत घेतले असेही ते म्हणाले आहे.
वरुण आणि रेश्मा यांच्यासह अजून दोघांनी भाजपत प्रवेश केला. अजून काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची आपल्याला शंका आहे. दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौर्‍यावर असून, महिन्यातील त्यांचा   हा तिसरा दौरा आहे. आज ते सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील घोघा ते  दाहेजदरम्यान ‘फेरी सेवे’चा शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचं बोललं जात आहे.