Breaking News

नगर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी साधणार जगाशी संवाद

पुणे, दि. 16, सप्टेंबर - सातशे कोटी लोकसंख्या असलेल्या दुनियेत माणसाला माणसाकडून माणूस बनण्यासाठीच शिकायचे आहे. त्यासाठी जगभरातील माणसांचा  एकमेकांशी सुसंवाद होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुण्यातील संगणकतज्ञ संतोष तळघट्टी व्यक्त केले. शिर्डी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सुरु  करण्यात आलेल्या ग्लोबल क्लासरूमच्या उद्घाटनप्रसंगी संतोष तळघट्टी बोलत होते. नगर जिल्ह्यातील ही पहिली ग्लोबल क्लासरूम असून, यामुळे या शाळेचे  विद्यार्थी जगाशी मुक्त संवाद साधू शकणार आहेत. 
याप्रसंगी शाळा विकास समितीचे अध्यक्ष ऍड. जे. के. गोंदकर, नगरसेवक सुजित गोंदकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आरिफ कादरी, मुख्याध्यापक शैलजा  वाघमारे आदी उपस्थित होते. तळघट्टी म्हणाले, कोणतीही गोष्ट शिकतांना ती तात्काळ अवगत होत नाही, त्यासाठी मोठा प्रयत्न करावा लागतो. ग्लोबल क्लारूममध्ये  विद्यार्थ्यांना जगातील विविध वस्तू, विषय, माणसे तसेच नैसर्गिक गोष्टींचा अभ्यास करता येणार आहे.
शिर्डीतील शाळा जिल्ह्यातील पहिल्या नंबरची शाळा असून या शाळेची स्थापना 1881 साली साईबाबांच्या हयातीत झाली आहे. या शाळेत 57 खोल्या आहेत. एकूण  पटावरची संख्या 802 असून 26 शिक्षक आहे. ग्लोबल क्लासरूमसाठी या शाळेची पहिली निवड होत असल्याने मनस्वी आनंद झाला आहे, केंद्रप्रमुख दातीर यांनी  सांगितले. यावेळी मुलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिमेवरील जवान, क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यांशी संवाद साधण्याची इच्छा  व्यक्त केली. ऑनलाईन बोलण्याची प्रात्याक्षीके करण्यात आली. त्यामध्ये जर्मनीतील श्रीमती आना यांच्याशी थेट विद्यार्थ्यांनी ऑनलाईन संवाद साधला.
’’सहा महिन्यापूर्वी शिर्डीला आलो होतो. त्यावेळी या शाळेला भेट दिली होती. वीजबिल थकल्याने येथे वीज नव्हती. तसेच संगणक कक्ष अनेक दिवसांपासून बंद  होता. ही परिस्थिती पाहिल्यानंतर हळूहळू स्थानिकांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने येथे काम सुरु केले. आज ही शाळा जिल्ह्यातील पहिली स्मार्ट शाळा झाली आहे  याचा फार आनंद वाटतो आहे. ’’
संतोष तळघट्टी, संगणकतज्ज्ञ