Breaking News

फडणवीस जादुगार नाहीत...

दि. 24, सप्टेंबर - बदल हा क्षणात होत नसतो. बदलाची प्रक्रीया निरंतर सुरू असते.क्षणात दिसणारा बदल शाश्‍वत नसतो.अशा बदलाला आपल्या भावनिक भाषेत  चमत्कार मानण्याची प्रथा आहे,चमत्कार चिरकाल टिकत नाही. क्षणिक समाधान चमत्कारातून कदाचित मिळेलही,पण शाश्‍वत फायदा हवा तर चमत्कार आणि बदल  यातील फरक लक्षात घेऊन प्रतिसाद देणारी विवेकबुध्दी आपण जागृत ठेवायला हवी.
सध्या केंद्र आणि राज्य सरकारच्या काम करण्याच्या पध्दतीवर होत असलेली टीका टिपण्णी लक्षात घेतल्यानंतर चमत्कार आणि शाश्‍वत बदल या संदर्भात सुज्ञ  नागरीक या नात्याने वस्तूस्थिती समजून घेणे प्रत्येकाचे मुलभूत कर्तव्य आहे.
सर्वप्रथम एक बाब जाणीवपुर्वक लक्षात घ्यायला हवी की,केंद्रात किंवा राज्यात काम करणारे कुठल्याही पक्षाचे सरकार म्हणजे चमत्कार करणारा जादुगार नसते.तुमच्या  आमच्यासारखी माणसंच सरकारमध्ये किंवा व्यवस्थेत काम करीत असतात.एखादे धोरण किंवा निर्णय लोकशाहीत सर्वानुमते घेत असतांना वेळ हा मुख्य घटक  असतो.सोबत घेतलेल्या निर्णयाची अमलबजावणी करतांना येणार्या तांञिक अडचणी, सामाजिक मानसिकता या सर्व गोष्टींचा प्रभाव कुठल्याही सरकारच्या धोरणात्मक  निर्णयावर असतो.त्याचा साकल्याने विचार करूनच सरकार निर्णय घेत असते.
विद्यमान राज्य सरकारच्या बाबतीत बोलायचे झाले तर,सरकारचे मुखिया असलेले देवेंद्र फडणवीस हे प्रचंड आशावादी,धिरगंभीर प्रवृत्तीचे अभ्यासू राजकारणी आहेत.  कुठल्याही राजकीय किंबहूना सत्ताधारी प्रशासकाकडे हवी ती पाञता आणि दुरदृष्टी फडणवीस यांच्यात ठासून भरली आहे. राहीला प्रश्‍न महत्वाकांक्षेचा... तीही  आहे.का नसावी? कुठलाही राजकीय नेता नव्हे कुणाही व्यक्तीकडे महत्वाकांक्षा नसेल तर तो त्या त्या क्षेञात यश संपादन करू शकत नाही.फडणवीस हे विरोधी  पक्षात असतांना जेव्हढ्या आक्रमकतेने राजकारण करीत होते तेव्हहढ्याच आक्रमकतेने ते आज राज्याचा कारभार करीत आहेत.मुख्यमंञी म्हणून ही आक्रमकता  इथवरच्या प्रवासात तरी महाराष्ट्राच्या दृष्टीने सकारात्मक म्हणावी लागेल.
महाराष्ट्र शासनाने अडीच वर्षात घेतलेला कुठलाही निर्णय पहा, तपासा.प्रत्येक निर्णयात मुख्यमंञ्यांची दुरदृष्टी डोकावते.अगदी जलयुक्त शिवारापासून शेतकर्यांच्या  कर्जमुक्तीपर्यंत प्रत्येक निर्णयाचे पडसाद हे क्षणिक नाहीत तर दुरगामी परिणाम करणारे आहेत.
आपली म्हणजे जनतेचे मानसिकता विचिञ आहे.आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतो.पण आम्हाला आमचा विकास चमत्कार झाल्यासारखा हवा असतो. 1960 मध्ये  संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आल्यानंतर 2014 पर्यंत म्हणजे तब्बल 54 वर्षातील त्या साडेचार वर्षाचा अपवाद सोडला तर तब्बल 50 वर्ष एकाच विचारसरणीची  म्हणजे काँग्रेस ,पुलोद आघाडीची सत्ता होती.या काळात कुठलाच जनहिताचा निर्णय घेतला नाही असे म्हणण्याची घोडचुक आम्ही करणार नाही,कारण आम्ही माध्यम  या नात्याने कुणाची भाटगीरी करायची म्हणून प्रतिस्पर्ध्यावर कारण नसतांना टीका करणे आमच्या कार्यसंस्कृतीत नाही अंधभक्तीला आमच्या कार्यप्रणालीत स्थान  नाही.तात्पर्य हे की आम्हाला कावीळीने पछाडले नसल्याने अमुक  एकाला झुकते माप देणे आम्हाला मान्य नाही म्हणून काँग्रेस प्रणित सरकारने अजिबात काम केले  नाही असे म्हणण्याचे पाप आम्ही करणार नाही.म्हणूनच पन्नास वर्षात काम झाले हे आम्ही तितक्याच प्रांजळपणे मान्य करतो.माञ त्याचबरोबर या सरकारमध्ये काम  करतांना दुरदृष्टीचा अभाव होता.हेही मान्य करावे लागते.
केवळ सवंग लोकप्रियतेच्या मागे धावून घेतलेले निर्णय काँग्रेसला जनमानसात लोकप्रिता मिळवून देण्यास यशस्वी ठरले.तथापि दुरगामी लाभ माञ त्या सरकारच्या  निर्णयामुळे जनतेच्या पदरात पडले नाहीत.
चमत्कार करण्यात काँग्रेस विचारसरणी तरबेज होती. जनतेची मानसिकता तशी बनली.त्याचा परिणाम विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयावर जनमानसात उमटणार्या  प्रतिक्रियांमधून दिसतो आहे.चमत्काराची सवय लागलेल्या जनतेला फडणवीस सरकारचे दुरगामी करू पाहणारे निर्णय पचत नाहीत असे दिसते.
अगदी सुरूवातीला म्हटल्यांप्रमाणे बदल घडून येण्यास काळाची प्रतिक्षा करावी लागते. एकाएकी, क्क्षणात दिसणारे बदल तात्कालीक समाधान देणारे असले तरी  त्याचा दुरगामी तोटा होऊ शकतो. अखेर सरकारमध्ये काम करणारे फडणवीस असतील किंवा अन्य कुणी हाडामासाची माणस आहेत, कुणी जादूगार नाही. म्हणून  धीरगंभीरपणे तटस्थपणे प्रत्येक निर्णय तपासल्यानंतर महायुतीचा कारभार तुलनात्मक सरस असल्याचे लक्षात येईल. मानसिकता बदलून या सरकारच्या कामाचे  परिक्षण करणे महत्वाचे आहे, अंधपणे कुणाची भक्ती किंवा टिका टाळल्यास वास्तव समोर येईल, तुर्तास इतकेच.