Breaking News

पिंपरी पालिका मुख्यालयातच दूषित पाणीपुरवठा

पुणे, दि. 26, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयातच दूषित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर बाब सोमवारी समोर आली आहे. पालिका  मुख्यालयातच दूषित पाणीपुरवठा होत असेल तर शहराची काय परिस्थिती असेल असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. महापौर नितीन काळजे यांच्या प्रभागात देखील  दूषित पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार महापौरांनी केली होती.
पवना धरणात शंभर टक्के पाणी असूनही नागरिकांच्या घरात पाणी नसल्याची ओरड नेहमीच येत आहे. शहराच्या विविध भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत  असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. महापौर नितीन काळजे यांच्या च-होली-मोशी प्रभागतही दूषित पाणीपुरवठा होत होता. त्यावरुन महापौरांनी पाणीपुरवठा  विभागाच्या अधिका-यांना फैलावर घेतले होते.
पालिका मुख्यालयात चौथ्या मजल्यावर असलेल्या ’फिल्टर’मधून हिरवेगार पाणी आले. फिल्टरमध्ये शेवाळे साचले आहे. नगरसेवक केशव घोळवे, तुषार हिंगे यांनी  या फिल्टरमधून पिण्यासाठी पाणी आणले असता हिरवेगार पाणी आले. याबाबत नगरसेवक घोळवे, हिंगे व माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी त्वरित आयुक्त  श्रावण हर्डीकर यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी पाण्याच्या टाकीची पाहणी केली. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, साफसफाई कर्मचा-यांकडे विचारणा करुन  स्वच्छता ठेवण्याबाबत कडक सूचना केल्या आहेत. तसेच फिल्टरला जाळ्या बसविण्याच्याही सूचना त्यांनी केल्या आहेत.
माजी नगरसेवक मारुती भापकर म्हणाले, पालिका मुख्यालयातच दूषित पाणीपुरवठा होत असेल तर शहरात काय परिस्थिती असेल. एकीकडे महापालिका शहरभर  स्वच्छता मोहिम राबवित आहे. तर, दुसरीकडे पालिका मुख्यालयातच पाण्याचे फिल्टर अस्वच्छ आहेत, हा मोठा विरोधाभास आहे. शहरातील करदात्या नागरिकाला  स्वच्छ पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. फिल्टरमध्ये शेवाळे साचले आहे. पाणी हिरवेगार येत आहे.