Breaking News

भूमिपूजन झालेल्या विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा खंडेनवमीच्या दिवशी - अजित पवार

पुणे, दि. 26, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात भूमिपूजन झालेल्या विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी माजी  उपमुख्यमंत्री अजित पवार खंडेनवमीच्या दिवशी म्हणजे (शुक्रवारी) पालिका मुख्यालयात येणार आहेत. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत शहरातील विविध  प्रलंबित कामासंदर्भात चर्चा करणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिली.
फेब्रुवारी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची एकहाती सत्ता आली. विकासकामे करुनही पराभव झाल्याने  अजितदादांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर दोन महिने त्यांनी शहराकडे पाठ फिरवली होती. मध्यंतरी राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी ते शहरात आले होते. आता  भाजपची सत्ता येऊन सहा महिने झाले आहेत. सत्ता नसली तर अजितदादा पालिकेत पाय रोवणार आहेत. पालिका मुख्यालयात येऊन शहरातील प्रलंबित कामाचा  आढावा घेणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या कार्यकाळात भूमिपूजन झालेल्या विकासकामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. तसेच शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍नांशी आयुक्त  श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे सत्ता गेली असली तरी अजितदादांचे पिंपरी-चिंचवड शहरावर प्रेम कायम आहे.पिंपरी पालिकेच्या वतीने  निगडीत भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानालगत 107 मीटर उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. निगडीतील हा झेंडा देशातील सर्वात उंच तिरंगा झेंडा असणार  आहे. पिंपरीतील जिजामाता रुग्णालय, भोसरी, चिंचवड येथील रुग्णालयाच्या कामाची सद्यस्थिती, भामा-आसखेड, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प, सामाविष्ट  गावातील रस्ते, आरक्षणे, रस्त्यांचे रुंदीकरण, बीआरटीएस प्रकल्प, तळवडे येथील ’डिअर’ पार्क, चिखलीतील प्रस्तावित संतपीठ, जेएनएनयूआरएम अंतर्गत  असलेली प्रलंबित कामे, शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, डेअरी फार्म येथील उड्डाणपुल, दिघीमार्गावरील संत नामदेव आणि संत ज्ञानेश्‍वर समूहशिल्प,  बोपखेलला जोडणारा पूल अशा विविध कामांचा अजितदादा आढावा घेणार आहे. तसेच शहरातील विकासकामांचे पुढे नियोजन काय असणार आहे, याबाबतही  आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबच दादा चर्चा करणार आहेत.