Breaking News

चोरी झाल्याची फिर्याद देणारा ट्रक चालकच निघाला आरोपी

बुलडाणा, दि. 02, सप्टेंबर - दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी साडेपाच लाखाचा ऐवज लुटल्याची तक्रार ट्रक चालकाने दाखल करताच शिवाजी नगर पोलिसांनी तपास चक्रे गतीने फिरवुन या घटनेचा अवघ्या दहा तासात छडा लावला आहे. याप्रकरणाची तक्रार करणारा ट्रक चालक व त्याच्या सहकार्‍यांनीच सदर लुटमारीचे प्रकरण संगनमताने घडवुन आणल्याचा प्रकार तपासात उघड झाला असून दोघांजवळुन मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तर ट्रक चालक व क्लिनर शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात असून खोटी तक्रार दिल्या प्रकरणी त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. 
या बाबत अधिक माहिती अशी की, 30 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 ते 12 वाजेदरम्यान ट्रकचालक बाबुराव सुभाष धापटे रा. रिहाखेडी ता. सिल्लोड जि. औरंगाबाद हा नागपुर येथे मिरची विकुन एमएच 20 सीटी 7479 या या आयशर ट्रकने औरंगाबादकडे जात होता. दरम्यान जुगनु ढाब्याजवळ 2 दुचाकीस्वारांनी ट्रक अडवुन त्यांना चाकुचा धाक दाखवत रोख 5 लाख 34 हजार व दोन मोबाईल असा एकुण 5 लाख 40 हजाराचा माल लुटून पोबारा केला. अशी तक्रार ट्रक चालक बाबुराव धापटे याने काल रात्री शिवाजी नगर पोलिस स्टेशनला दिली. यावरुन पोलिसांनी भादंवि कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला. या लुटमारीच्या घटनेची शिवाजी नगर पोस्टेचे ठाणेदार संतोष ताले यांनी तातडीने दखल घेवून तपासाची चक्रे वेगाने फिरवत पीएसआय शक्करगे, पोकाँ रविंद्र कन्नर, विक्रम राठोड, सुनिल देव यांच्यासह सदर प्रकरणाचा तपास सुरु केला. या दरम्यान अनेक संशयास्पद बाबी पोलिसांच्या नजरेस आल्याने त्यांना सदर प्रकरण बनावट असल्याची शंका आली. यामुळे त्यांनी फिर्यादी ट्रक चालक बाबुराव धापटे व क्लिनर बालाजी रामदास धापटे या दोघांना पोलिसी खाक्या दाखवताच प्रकरणाचे सत्य बाहेर आले. ट्रक चालक व त्याच्या सहकार्‍यांनीच सदर प्रकरण संगनमताने घडवुन आणत पोस्टेला खोटी तक्रार दिली. दरम्यान ट्रक चालकाच्या माहितीवरुन पोलिसांचे पथम सिल्लोडकडे रवाना करण्यात आले होते. तर या पथकाने रक्कम नेणार्या दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडुन मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. तर या बनावट प्रकरणी आरोपींवर कारवाई होणार असल्याची माहिती ठाणेदार संतोष ताले यांनी दिली.