स्टीव्ह स्मिथकडून हार्दिक पांड्यांचे कौतुक

इंदूर, दि. 26, सप्टेंबर -  ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं भारताचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक पांड्याचं बरंच कौतुक केलं आहे. कालच्या (रविवार)  सामन्यात देखील पांड्यानं मोक्याच्या वेळी अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका साकारली.  206 धावांवर भारतानं 4 गडी गमावले होते. तेव्हा  पांड्यानं खेळपट्टीवर तळ ठोकून भारताला विजयासमीप नेलं. मात्र, विजयासाठी 10 धावा शिल्लक असताना तो बाद झाला. त्याच्या याच खेळीचा प्रभाव कर्णधार  स्मिथवर देखील पडला.
पांड्याबाबत बोलताना स्मिथ म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. पण भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जर  धावसंख्या 330च्या पुढे गेली असती तर सामन्याचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता. पण, तरीही विजयाचं श्रेय भारताला द्यायला हवं. हार्दिकनं उत्कृष्ट खेळ  केला. तो शानदार खेळाडू आहे.’ यावेळी स्मिथनं आपल्या संघाचा सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचचंही कौतुक केलं. दुखापतीमुळे दोन सामन्यात बाहेर असलेल्या फिंचनं  तिसर्‍या सामन्यात 124 धावांची धडाकेबाज खेळी केली. ‘फिंचनं शानदार खेळी केली. त्याचं शतक शानदार होतं. शेवटच्या काही षटकांमध्ये आम्ही चांगली  फलंदाजी केली नाही. त्यामुळेच आमच्या धावा कमी झाल्या.’ असंही स्मिथ यावेळी म्हणाला.