Breaking News

महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - महापूर व दुष्काळाच्या समस्येवर उपाय म्हणून महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाचे काम एक महिन्यात सुरु होणार असल्याची माहिती  सरकारी सूत्रांनी दिली . या प्रकल्पासाठी 87 अब्ज डॉलर एवढा प्रचंड खर्च केला जाणार आहे .मोदी सरकारने ही योजना जलद गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला  आहे . या योजनेला आवश्यक असणार्‍या मान्यता वेगाने मिळाव्यात या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने लक्ष घातले आहे , असेही सूत्रांनी सांगितले. 
या योजनेत गंगा नदीबरोबरच अन्य 60 नद्या जोडल्या जाणार आहेत. या नदी जोड प्रकल्पामुळे लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल , अशी आशा सरकारकडून  व्यक्त केली जात आहे. यंदा बिहार, उत्तर प्रदेश, आसाम या राज्यांमध्ये आलेल्या महापूरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश व मध्य  प्रदेश या राज्यांतून वाहणा-या केन आणि बेतवा या नद्या जोडल्या जाणार आहेत. या जोड प्रकल्पातून हजारो मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाला  पर्यावरणवादी, व्याघ्रप्रेमी व अन्य स्तरावरून विरोध असतानाही तो पूर्ण केला जात आहे.2002 मध्ये केंद्रातील तत्कालीन वाजपेयी सरकारने नदी जोड प्रकल्पाची  घोषणा केली होती . मात्र नंतरच्या काँग्रेस आघाडीच्या सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले.