Breaking News

कामगारांच्या संपामुळे एस.टी. कामगार संपू नये : भाई जगताप

पुणे, दि. 25, सप्टेंबर - हक्काच्या मागण्यांसाठी संप हा झाला पाहिजे. पण या संपामुळे एसटी कामगार हा संपू नये, असे मत आमदार भाई जगताप यांनी व्यक्त  केले. पुण्यात काँग्रेसभवन येथे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस शैक्षणिक शिबिराचे आयोजनप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी सुनिल लांडगे, अरुण पेठे आणि राज्यातील डेपोतील संघटनेचे प्रमुख उपस्थित होते. सध्या एसटी ही एका कठीण काळातून जात आहे. ती वाचवणे हे  प्रत्येकाचे काम आहे. गेल्या काही वर्षांपासून वेतन करार केले जात नाहीत. त्यामुळे राज्य शासनातील कर्मचारी आणि एसटीचा कामगार यांच्या वेतनात तफावत आहे.  यासाठी अनेक संघटना संप पुकारत आहेत. पण खरंच या संपातून तो उद्देश साध्य होतो का ? हा एक प्रश्‍नच आहे. यासाठी आता कामगारांनी एकत्र आले पाहिजे.  सध्या सातवा वेतन आयोगाची मागणी केली जाते. पण हा आयोग काय आहे याची माहिती नाही. सर्व संघटनांनी एक कृती समिती स्थापन केली आहे. त्यांनी जर  एकत्र येऊन ठरवले तर वेतन करार प्रत्यक्षात येईल. यासाठी एसटी कर्मचारी काँग्रेस नेहमीच पुढे येईल, असे भाई जगताप यांनी यावेळी सांगितले.