Breaking News

हैदराबादमध्ये दुसरीतील विद्यार्थ्याला मारहाण; प्राचार्यावर गुन्हा दाखल

हैदराबाद, दि. 11, सप्टेंबर - हैदराबादमधील एका खासगी शाळेतील दुसरीतील विद्यार्थ्याला प्राचार्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या  प्रकरणी तप्पाचबुतरा पोलिसांनी प्राचार्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी गुरुग्राममधील रेयान इंटरनॅशनल स्कूलमधील एका विद्यार्थ्याची गळा  चिरुन हत्या केल्याची घटना घडली असतांनाच ही नवी घटना घडली आहे.
सुरेश सिंह असे या प्राचार्यांचे नाव आहे. सिंह यांनी वर्गातील फळ्यावर काही शब्द लिहिले होते आणि ते मुलांना वाचायला सांगितले होते. ते शब्द माझ्या मुलाला  वाचता न आल्याने रागाच्या भरात सिंह यांनी मुलाला मारहाण केली. मी प्राचार्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे, असे त्याच्या आईने सांगितले. मुलाच्या  आईने केलेल्या तक्रार केल्यानंतरही अद्याप प्राचार्यांना अटक करण्यात आली नाही. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. प्राचार्यांना  तात्काळ अटक करण्यात यावी आणि शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी शहरातील एका सामाजिक संस्थेने केली आहे.