Breaking News

सत्यनारायण पावला नाही म्हणून गुन्हे दाखल करण्यास पुढे या...

 दि. 12, सप्टेंबर - डॉ. मेधा खोले प्रकरणाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे समाज जीवन ढवळून निघाले आहे. अ‍ॅक्शन अँड रिअ‍ॅक्शन इज इक्वल अँड अपोझीट हा  न्यूटनचा तिसरा नियम या प्रकरणानंतर प्रत्यक्षात अनुभता येऊ लागला आहे. खरे तर हे प्रकरण म्हटले तर अगदीच अदखलपात्र आहे म्हणजे केवळ फसवणूकीचा  एक गुन्हा या नजरेने या प्रकरणाकडे पाहीले तर प्रकरणाची हवा विरळ होते. मात्र त्याची दुसरी बाजू लक्षात घेतली या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात येते. त्यामागे  असलेल्या षडयंत्रासाठी वापरली जाणारी सडकी बुध्दीही अधोरेखीत होते. रामाचे उदात्तीकरण करणारी ही प्रवृत्ती रामाचं मोठेपण अधोरेखीत करण्यासाठी शबरीच्या  उष्ट्या बोरांचे उदाहरण देणारी ही प्रवृत्ती यादवकुलीन मराठा बाईने स्वयंपाक केल्याने गौरी गणपती आणि पितरं अपवित्र होतात असा गुन्हा दाखल करण्यास धजावते.  गुन्हा दाखल करण्यासाठी आधार कुठला घेते?, तर त्या प्रवृत्तींनी हजारो वर्ष ज्यांना गावकुसाबाहेर राहण्यास मजबूर केले त्या शुद्र समाजातील एका विद्वानाने  लिहीलेला घटनेचा... खरे तर याच घटनेचा आधार घेऊन समाजाने विशेषतः हाफ चड्डीत संचलन करून मनुवाद्यांची मानसीक गुलामगीरी स्वीकारलेल्या छत्रपतींच्या  वारसांनी सत्यनारायणादी कर्मकांडांतून आश्‍वासीत फायदा झाला नाही म्हणून सोवळ्यात फसवणूक केली, असा गुन्हा दाखल करायला काय हरकत आहे...
गर्व से कहो हम हिंदू है! अशी आरोळी ठोकून दोन दशकापुर्वी तमाम बहुजनांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणून बाबरी मस्जीद उध्वस्त करणार्‍या जातकुळीने  वेळोवेळी बहुजनांचा स्वार्थासाठी फक्त आणि फक्त वापर केला. हे इतिहासाने आणि वर्तमानानेही दाखवून दिल्यानंतरही समाजाच्या डोळ्यावरची झापड उघडायला  तयार नाहीत. याच प्रवृत्तींचा वारसा सांगणार्‍या खोले बाईच्या घरात मराठा समाजाच्या बाईने स्वयंपाक केल्याने गौरी गणपतीच नव्हे मेलेले पुर्वजही बाटले. मात्र याच  मराठा आणि अन्य ब्राम्हणेतर समाजाच्या लाखो करोडो तरूण पोरांच्या हातून अयोध्येला वीटा वाहून नेतांना यांचा धर्म बाटला नाही की राम कोपला नाही.  कोपणारही नाही.
या प्रवृत्तींचा जिथे जिथे स्वार्थ असतो तिथे तिथे धर्म कुलाचार वगैरे दुय्यम ठरतात. आता या खोले बाईचेच घ्या.. लहानची मोठी झाली, शिकली सवरली नोकरीला  लागली... या प्रवासात हजारो वेळा या बाईचा तिच्या नजरेत शुद्र असलेल्या समाजाशी थेट संबंध आला असेल. तिच्या दृष्टीने शुद्र असलेल्या समाजाच्या  अस्तित्वामुळेच ती जगली, जगते आहे आणि जगणार आहे. बहुजन समाजाला कर्मकांडात गुंतवणूक, त्यांची फसवणूक करून त्यांची मानसिक आणि आर्थिक लुट  करून तिच्या पुर्वजांनी  कमावलेल्या मिळकतीवरच ती जगत आली शिकली असणार म्हणजे तिच्या नजरेत शुद्र असलेल्या समाजाची कमाई तिच्या नसानसात आहे.
मग या बाईच खरे तर जगणेच बाटले आहे. या मागचा विनोदा सोडा गांभिर्य लक्षात घ्या. या घटनेतून धडा घ्या. आम्ही आणखी किती दिवस कर्मकांडात गुरफटून या  प्रवृत्तींची मानसिक गुलामी करणार आहोत? याचा विचार करा.
या प्रवृत्तींनी हजारो वर्ष आमची फसवणूक केली. आमच्या दैवतांची फसवणूक केली. त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल का करू नयेत...?
लग्न जमवितांना कुंडली जूळवतात तरी पण लग्न मोडतात नविन घरात सुख शांती लाभावी म्हणून वास्तू शांती करण्यास सांगतात तरी पण घरात सुख -शांती लाभत  नाही.
नविन गाडीची पुजा त्यांच्या हाताने करून देखील जर अपघात होतात. नविन दुकान उघडले, किंवा व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून अमुक एक पुजा करण्यास  सांगतात तरी धंदा तोट्यात... त्र्यंबकेश्‍वरला जाऊन पिंडदान, कालसर्प, नारायण नागबली असे विधी करून घेतले जातात.. हजारो रूपये प्रतीविधीसाठी उकळले  जातात, फायदा मात्र काहीच होत नाही. मग अशा फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये बहुजन समाजाने विशेषतः बहुजन समाजाचा मोठा भाऊ म्हणवून घेणार्‍या  मराठा  समाजाने गुन्हे दाखल करण्यास पुढे यायला काय हरकत आहे. हाफ चड्डी घालून दसरा संचलन करण्यात मोठेपण मिरवणार्‍या मराठा समाजावर यासंदर्भात मोठी  जबाबदारी आहे, हे विसरता येणार नाही.