शिरवणे ‘एमआयडीसी’तील कंपनीला भीषण आग
नवी मुंबई, दि. 11, सप्टेंबर - रंग बनविणा-या एका कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागण्याची घटना शिरवणे एमआयडीसीत घडली. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले, तरी संपूर्ण कंपनी आगीत जळून खाक झाली आहे. त्यामुळे कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. साकेत इंडस्ट्रिज असे या कंपनीचे नाव आहे. आज सायंकाळी 4.30 वाजता या कंपनीत शॉर्टसर्किट होऊन आग लागली. रबाळे, महापे व नवी मुंबई महापालिका यांच्याकडून देखील अग्निशमन गाड्या मागवून ही आग दोन तासांत आटोक्यात आणण्यात आली. सदर कंपनीत रंग बनविण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल होते. या केमिकलने पेट घेताच कंपनीतील कामगारांनी कंपनी बाहेर धाव घेऊन शिरवणे अग्नीशमन दलाला फोन केला. काही मिनिटांतच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न स्टेशन अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले होते.
