Breaking News

संगणक परिचालकांच्या संपामुळे ग्रामपंचायतींची कामे ठप्प

रत्नागिरी, दि. 28, सप्टेंबर - संगणक परिचालकांनी संप पुकारल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील कामे ठप्प झाली आहेत. आपले सरकार सेवा केंद्रात  ग्रामपंचायतीत कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांना गेल्या फेब्रुवारीपासून मानधन मिळालेले नाही. काम करूनही मानधन मिळत नसल्याने  त्यांच्यावर उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. ग्रामविकास विभागाची टास्क कन्फर्मेशनची जाचक अट व कंपनी व्यवस्थापनाच्या धोरणामुळे संगणक वैतागलेल्या  राज्यातील संगणक परिचालकांनी गेल्या सोमवारपासून (दि. 25 सप्टेंबर) बेमुदत संप सुरू केला आहे. संग्राम प्रकल्पात काम करणार्या सर्व परिचालकांना आपले  सरकार सेवा केंद्रात समाविष्ट करण्याचे आश्‍वासन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र अद्यापही काही कर्मचार्यांना यात सामावून घेतलेले नाही. ई-ग्राम  सॉफ्टवेअर संपूर्णपणे बनावट असल्याने त्याचा परिणाम परिचालकांच्या मानधनावर झाला आहे. काही परिचालकांना गेल्या डिसेंबरपासून तर राहिलेल्यांना  फेब्रुवारीपासून मानधन मिळालेले नाही. ग्रामपंचायत तसेच शासनाकडून संबंधित ठेकेदार कंपनीला मानधनाची रक्कम देण्यात आली. मात्र परिचालकांना ते मिळालेले  नाही. यातील टास्क कन्फर्मेशन ही जाचक अट रद्द करून सहा हजाराचे निश्‍चित वेतन द्यावे. रखडलेले मानधन तत्काळ मिळावे, संग्राम प्रकल्पातील ग्रामपंचायत,  पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व परिचालकांना आपले सरकार सेवाकेंद्रात सामावून घ्यावे. सीएससी-एसपीव्हीने प्रिया सॉफ्टच्या नावाखाली कपात  केलेले मानधन परत करावे. नागरिकांना देण्यात येणार्या दाखल्यांमागे परिचालकांना साठ टक्के कमिशन द्यावे, नवीन ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्याने  नागरिकांना सेवा देण्यात अडचणी येतात. त्यामुळे सॉफ्टवेअर बदलून चांगल्या दर्जाचे सॉफ्टवेअर द्यावे. महाऑनलाईनकडील डिसेंबरपासून रखडलेले मानधन मिळावे.  परिचालकांना सामाजिक सुरक्षा मिळावी. कंपनीतर्फे परिचालकांची नियुक्ती करण्यात यावी. हजर करून न घेतलेल्या परिचालकांना तत्काळ घेण्यात यावे.  परिचालकांना सेवतून बडतर्ङ्ख करताना गटविकास अधिकार्यांकडे बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. चुकीचे क्लस्टर तयार केलेल्या जिल्ह्यातील संबंधित  अधिकार्यांना क्लस्टर सुधारणेबाबत आदेश द्यावेत. ज्या ग्रामपंचायतींचा समावेश नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये झाला आहे, तेथे नगरविकास  विभागाकडून कामावर घेण्यासाठी शिफारस करावी, अशा मागण्यांचे निवेदन परिचालक संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
मागण्या मान्य होईतोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा परिचालक संघटनेने दिला आहे. आंदोलनामुळे ग्रामपंचायतींचे संगणकीकृत कामकाज ठप्प  होण्यास सुरुवात झाली आहे.