Breaking News

नागपुरात तरुणीवर सामूहिक बलात्कार; गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार

नागपूर, दि. 25, सप्टेंबर - शीतपेयात गुंगीचे औषध देऊन एक तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना 23 सप्टेंबर रोजी नागपुरातील हुडकेश्‍वर  परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणासह तीन तरुणींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी एका कॉल सेंटरमध्ये काम करते.तिच्यासोबत काम करणार्‍या सुप्रिया पाटील आणि लीना धांदे यांच्याशी  पीडित तरुणीची मैत्री होती. सुप्रिया आणि लीनाची एक मैत्रिण मानकापूर परिसरात राहते. गेल्या 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता सुप्रिया आणि लीनाने  पीडित मुलीला उदयनगरातून मानकापूरला मैत्रिणीच्या सदनिकेत नेले. तेथे एक अनोळखी व्यक्ती उपस्थित होती. पीडित तरुणीला आरोपींनी शीतपेयातून गुंगीचे  औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजतापर्यंत दोन ते चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला  असह्य वेदना होऊ लागल्या. याबाबत पीडितेने मैत्रिणींना जाब विचारला असता त्यांनी तिला बदनामी करण्याची भीती दाखवून गप्प बसवले.
बदनामीच्या धाकाने पीडित तरुणी गप्प बसल्यानंतर आरोपी तिला वारंवार तेथे येण्यासाठी फोन करू लागले. त्यांचा त्रास वाढत चालल्यामुळे पीडित तरुणी 23  सप्टेंबर रोजी हुडकेश्‍वर ठाण्यात पोहचली. तिने तेथे सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी तीन तरुणींसह चार आरोपींविरुध्द सामूहिक  बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी धावपळ करून सुप्रिया आणि लीनाला अटक केली. प्राथमिक तपासात या तरुणीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा संशय  बळावला आहे. पोलीस या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.