Breaking News

बोफोर्स प्रकरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार सुनावणी

नवी दिल्ली, दि. 02, सप्टेंबर - बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. याप्रकरणी भारतीय  जनता पक्षाचे नेते अजय अग्रवाल यांनी याचिका दाखल करुन लवकरात लवकर याप्रकरणी सुनावणी घ्यावी अशी मागणी केली होती. केंद्रातील तत्कालीन सरकारने  सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करु दिली नाही असा दावाही अग्रवाल यांनी केला होता. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने  तयारी दर्शवली आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने 31 मे 2005 मध्ये घोटाळ्यातील आरोपींना दोषमुक्त केले होते. मात्र या निर्णयाला केंद्रीय अन्वेषण विभागाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान  दिले नव्हते.
भारताने 24 मार्च 1986 रोजी स्वीडनच्या एबी बोफोर्स कंपनीशी 410 हॉवित्झर तोफा खरेदीचा एक हजार 500 कोटींचा करार केला होता. त्यासाठी कंपनीने 64  कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता.