Breaking News

वाहतूक कोंडी सोडवा, अन्यथा चक्का जाम - श्रीरंग बारणे

पुणे, दि. 15, सप्टेंबर - डांगे चौक, पिंपळे-सौदागर येथील जगताप डेअरी चौक येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरातील नागरिक वाहतूक  कोंडीने हैराण झाले आहेत. येत्या चार दिवसात वाहतूक व्यवस्था सुरळीत न झाल्यास चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी  दिला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पोलीस आणि पालिकेच्या अधिका-यांसह डांगे चौक, पिंपळे-सौदागर चौकातील वाहतूक कोंडीची पाहणी केली. यावेळी  वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे, नगरसेवक निलेश बारणे, अ‍ॅड. सचिन भोसले, गजानन चिंचवडे, पालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील,  उपअभियंता ज्ञानेश्‍वर पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव झुंजारे, हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
डांगे चौक, पिंपळेसौदागर, औंध-रावेत रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेकदा वाहनांच्या  लांबच-लांब रांगा लागलेल्या असतात. डांगे चौक परिसरातून हिंजवडी आयटीकडे जाणा-यांची संख्या जास्त आहे. वाहतूक कोंडीमुळे अभियंत्यांना कंपनीत  जाण्यासाठी वेळ लागत आहे. जगताप डेअरी चौक, डांगे चौकात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे हातगाड्या उभ्या असतात.या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण  झाले असून याकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या वाहतूक कोंडीमध्ये हैराण झालेले हिंजवडी  आयटी पार्कमधील अभियंते तसेच थेरगाव परिसरातील नागरिकांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्याची विनंती केली होती. त्यानुसार  खासदार बारणे यांनी गुरुवारी वाहतूक पोलीस आणि अधिका-यांसह वाहतूक कोंडीची तासभर पाहणी केली. वाहतूक कोंडी सोडविण्याच्या विविध सूचना त्यांनी  पोलीस आणि अधिका-यांना केल्या आहेत.