Breaking News

अगस्ति पतसंस्थेमुळे अनेकांची आर्थिक पत टिकली :आ.पिचड

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - पतसंस्थां चळवळ मोडली तर भविष्यात गोरगरिबांचे जिने  मुश्किल होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या  चुकीच्या धोरणामुळे   पतसंस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवरही अकोले तालुक्यातील पतसंस्थांची मातृसंस्था असलेल्या अगस्ती  पतसंस्थेने गोरगरिबांची  पतसंस्था अशी पत समाजात निर्माण केली आहे. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर व त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने कठीण परिस्थितीत चांगले व  समाधानकारक काम केले असल्याचे गौरवोद्गार आमदार वैभवराव पिचड यांनी केले.
येथील अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल मंगळवारी जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहात खेळीमेळीच्या  वातावरणात पार पडली. यावेळी आ. पिचड बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर होते. यावेळी आ. पिचड बोलत होते.
याप्रसंगी अ. ता. एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष जे डी आंबरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, अगस्ती कारखान्याचे संचालक प्रकाशराव मालुंजकर, गुलाबराव  शेवाळे, मिनानाथ पांडे, जि. प. सदस्य रमेशराव देशमुख, माजी अध्यक्ष रमेशराव धुमाळ, विठ्ठलराव  आभाळे, निवृत्ती साबळे, माधवराव वैद्य, राधाकीसन धुमाळ,  पुंजा आवारी, संचालक विनोद रासने, वसंतराव धुमाळ, सुरेश देशमुख, देवराम गायकर, भाऊसाहेब रकटे, डी. डी. देशमुख, बी. बी. गोडसे, अकोले शाखाधिकारी  चंद्रभान आवारी, मुख्य लेखापाल पांडुरंग नवले, मुख्य लोन अधिकारी बाबासाहेब देशमुख आदी अधिकारी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. वैभवराव पिचड यांनी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर यांच्या कार्याचे कौतुक करतांना अगस्ती पतसंस्थेने तालुक्यातील सहकार व शैक्षणिक  संस्थांना आर्थिक मदत केली. नोटा बंदी व कर्जमाफी या निर्णयामुळे पतसंस्थांच्या अडचणी वाढल्या. शासनाने जरी कर्जमाफीची घोषणा केली तरीं पतसंस्थांच्या  कर्जाचा त्यात संबंध नसून हा पैसा सर्वसामान्यांचा ठेवींच्या रूपाने पतसंस्थांच्या मध्ये असतो त्यामुळे पतसंस्था चळवळ टिकविण्यासाठी सर्व कर्ज दारांनी आपले  पतसंस्थांचे कर्जे भरावीत असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये गोरगरिबांना  कर्ज मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासाठी ससेहोलपट होतांना दिसत आहे. शेतकरी हा पतसंस्थांचा कणा आहे. पतसंस्था  याच गोरगरिबां साठी तारणहार असून ही चळवळ टिकली नाही तर गोरगरीब व शेतकर्‍यांना अडचणीला सामोरे जावे लागेल असे आ.पिचड यांनी सांगितले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी तालुक्यातील सर्वाधिक सभासद संख्या असलेली अगस्ती ही पहिली पतसंस्था असून सर्व सहकारी व शिक्षण  संस्था यांना मदतीचा हात पुढे केला. अडचणीच्या परिस्थीतीतून पतसंस्था चळवळ मार्गक्रमण करत आहे. सरकारच्या नोटाबंदी व कर्जमाफी घोषणे मुळे जिल्हा  बँकेबरोबरच पतसंस्था ही अडचणीत आल्या.
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर यांनी अगस्ती पतसंस्थेने  271 कर्जदारांवर कारवाई केली असून थकीत कर्जदारांच्या 419 एकर क्षेत्राचा कब्जा  मिळविला असल्याचे निदर्शनास आणून दिले. नोटा बंदी काळात ठेवीदार व सभासद यांना मदतीचे धोरण संस्थेने घेतल्याचे सांगत संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा  आढावा घेतला.
यावेळी सभासद देविदास पोखरकर यांनी कर्जदारांच्या खात्यावर व्याज आकारणी ही दोन महिन्या ऐवजी तीन महिन्यानंतर आकारावी अशी मागणी केली. प्रास्ताविक  व स्वागत अनिल गायकवाड यांनी केले. श्रद्धांजली ठराव  उपाध्यक्ष तुकाराम उगले यांनी मांडून शेवटी आभार प्रदर्शन केले.
विषयपत्रिका  व इतिवृत्त वाचन कार्य. संचालक संपतराव साबळे यांनी केले.