Breaking News

ऊसदरात कुकडी जिल्ह्यात ‘नंबर वन’ - आ. जगताप

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - ’कुकडी’ कारखान्यात सतत नवनवीन तांत्रिक बदल केले आहेत. आसवनी आणि सहवीजनिर्मिती प्रकल्पांसह कारखान्याची  गाळपक्षमता देखील वाढविली. मागील हंगामात ’कुकडी’ कारखान्याने इतरांपेक्षा दोनशे रुपयांनी अधिक बाजार दिला असून बाजारभावाच्या बाबतीत ’कुकडी’  कारखाना जिल्ह्यात ’नंबर वन’ असल्याचे प्रतिपादन ’कुकडी’ कारखान्याचे अध्यक्ष आ. राहुल जगताप यांनी केले. 
’कुकडी’ कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, कारखान्यावरील कर्ज वाढले असल्याचे मान्य आहे. मात्र त्यासोबत कारखान्याचा विस्तारदेखील  झाला आहे. कारखान्याचा विस्तार केल्याने उत्पन्न वाढणार असून त्यामुळे पुढील दोन वर्षांत कारखान्यावरील कर्ज फेडले जाईल. मागील हंगामात ऊस कमी  असताना कारखाना सुरू केल्याने तोटा झाल्याचे दिसत असले तरी कारखाना बंद ठेवला असता तर अधिक अडचणींना तोंड द्यावे लागले असते, असेही आ.जगताप  यांनी सांगितले.
शिवसेनेचे जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार म्हणाले, वार्षिक अहवाल हा कारखान्याच्या कारभाराचा आरसा असतो. अहवाल बघता कारभार चिंताजनक असल्याचे  चित्र दिसते. मागील हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस नसताना कारखाना सुरू केल्याने कोट्यवधींचा तोटा झाल्याचे चित्र आहे. कारखान्याचे नामांतर  करण्याला आमचा अजिबात विरोध नाही. मात्र कारखान्याच्या नावातून ’कुकडी’ हा शब्द काढू नये.  दिनकर पंधरकर म्हणाले, कारखान्याच्या कारभाराला कधीच  विरोध केला नाही. सभासदांसाठी आम्ही लढत आहोत. ’कुकडी’ कारखाना मोठ्या आर्थिक अडचणीत असल्याचे दिसत आहे. कारभारात सुधारणा होणे गरजेचे आहे.  यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे, अतुल लोखंडे, धोंडिबा लगड, आदींची भाषणे झाली.
आता दूध का दूध.... होऊनच जाऊ द्या
काही लोक माझ्यामागे माझ्यावर टीका करतात. ज्यांनी संस्था बुडविल्या, तेच सहकार कसा चालवायचा हे शिकवत आहेत. ज्यांना बोलायचे आहे, त्यांनी समोर  बोलावे, त्यांना उत्तर देण्याची माझी तयारी आहे. एकदाचं ’दूध का दूध अन्  पाणी का पाणी’ होऊनच जाऊ द्या, असे म्हणत आ. जगताप यांनी नामोल्लेख टाळून  माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना आव्हान दिले. आता दूध का दूध.... होऊनच जाऊ द्या