Breaking News

कळसच्या महिलांचा तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या

अहमदनगर, दि. 28, सप्टेंबर - तालुक्यातील कळस बुद्रुक येथील आडाचा मळा या शिवार रस्त्यावर आलेली झाडीझुडपे काढण्यासाठी महसूल विभागाने  घटनास्थळी उपस्थित रहावे, त्यामुळे काही स्थानिक ग्रामस्थ कामात अडथळा आणणार नाही, असे म्हणत कळसच्या महिलांनी तहसीलदारांच्या दालनासमोर तब्बल  दोन तास ठिय्या आंदोलन केले.
कळस बुद्रुक येथील आडाचा मळा परिसरातील तरुण मित्र मंडळाच्या वतीने नवरात्री निमित्त देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास  नवरात्रीचे कार्यक्रम आटोपल्यावर जमलेल्या महिलांनी रस्त्याच्या कडेला असलेली व रस्त्यात आलेली झाडेझुडपी काढण्याचा प्रस्ताव मांडला. शासकीय रस्ता  असलेल्या या रस्त्याच्या कडेला अनेक झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे अनेकदा अपघात देखील घडले आहेत. त्यामुळे आपण या रस्त्याची स्वछता  करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून देऊ या उदात्त भावनेने परिसरातील शेकडो महिला भर रात्रीच रस्ता साफ करण्याच्या कामाला झोम्बल्या.थोड्या अंतरावर  असणार्‍या रस्त्याची साफसफाई पार पडल्यानंतर याच परिसरातील काही नागरिकांनी महिलांना व त्यांच्यासोबत असलेल्या पुरुषांना शिवराळ भाषेत शिवीगाळ केली.  हा वर्दळीचा रस्ता मोकळा झाला तर सर्वांचा जाण्यायेण्याचा प्रश्न सुटेल ,अशी भावना महिला व या परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते.परंतु वातावरण काही  निवळत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या स्त्री शक्तीने रुद्रावतार धारण करीत सदर रस्ताच खोदून टाकीत वाहतूक बंद करून टाकली.दरम्यान या रस्त्याच्या कडेला  अनेक शेतकर्‍याच्या जमीनी आहेत. त्यामुळे आपल्या जमिनीत रस्त्याचे अतिक्रमण होऊ नये म्हणून काही शेतकर्‍यांनी शिवीगाळी केली असल्याचे समजले.
दरम्यान या घटनेने संतप्त झालेल्या महिलांनी एवढ्यावरच न थांबता काल मंगळवारी दुपारच्या सुमारास शेकडोंच्या संख्येने जमून अकोले  तहसील कार्यालय गाठले.  याप्रसंगी प्रभाकर वाकचौरे, अशोक नाना वाकचौरे, प्रवीण वाकचौरे, धनराज वाकचौरे, अवधूत वाकचौरे, विजय वाकचौरे, वसंत वाकचौरे, बाळासाहेब हुलवळे,  सोपान वाकचौरे, मंदाकिनी वाकचौरे, संगीता चौधरीे, राजुबाई वाकचौरे, सुनीता चौधरी, शारदा वाकचौरे, उजवला वाकचौरे, सुजाता वाकचौरे, वृषाली वाकचौरे,  रोहिणी वाकचौरे, अनिता वाकचौरे आदी उपस्थित होते. सुरुवातीला नायब तहसीलदार जगदीश गाडे यांनी महिलांशी चर्चा केली. यावेळी भावनाविवश झालेल्या  महिलांनी आपली कैफियत मांडण्यास सुरुवात केली. रस्त्यावर आलेल्या गंधारीच्या झाडांमुळे आम्हला या रस्त्यावरून जाणे मुश्कील होऊन बसले आहे. मुलांची  शाळा सुटल्यानंतर मुले घरी येईपर्यंत अंधार पडतो, त्यामुळे या काटवणात बिबट्या दबा धरून बसत आहे. मुले जीव मुठीत धरून घरचा रस्ता धरतात. रस्त्यावरून  प्रवास करणार्‍या अनेक जणांच्या तोंडाला काटवणाचे फटके बसले आहे. याशिवाय समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अनेक अपघात देखील घडले आहेत.  त्यामुळे आम्ही शासकीय  मदतीची अपेक्षा न करता स्वतः रस्ता साफ करीत होतो. मात्र काही स्थानिक नागरिकांनी यात हस्तक्षेप केल्याने हे काम बंद पडले आहे. हे  काम पूर्ण करण्यासाठी आपल्या महसूल विभागाचे काही अधिकारी घटनास्थळी पाठवावेत, अशी मागणी महिलांनी केली. यावर गाडे यांनी घटनास्थळी येऊन रस्ता  मोकळा करू असे आश्‍वासन दिले.
मात्र महिला म्हणाल्या की, तुम्ही जोपर्यंत कळसला येत नाही तोपर्यंत आम्ही इतेच बसणार असे म्हणत महिला तब्बल दोन तास तहसीलदारांच्या कार्यालयासमोर  ठाण मांडून बसल्या. काही वेळानंतर तहसीलदार मुकेश कांबळे हे कार्यालयात दाखल झाले. त्यांनी कळसचे तलाठी बाजीराव गडदे यांच्याशी व ग्रामस्थानशी चर्चा  करून रस्ता मोकळा करून  देण्यासाठी ताबडतोब अधिकारी पाठवितो असे  सांगितले.
काही वेळाने नायब तहसीलदार जगदिश गाडे, मंडलाधिकारी श्री. कडलग, तलाठी बाजीराव गडदे व ग्रामस्थ रस्त्यावर  दाखल झाले. महसुलच्या अधिकारांच्या  उपस्थित अखेर रस्ता मोकळा करण्यात आला. दरम्यान या घटनेने शांतता प्रिय गाव म्हणून नावलौकिक असलेल्या कळस गावात चांगलीच अशांतता पसरली होती.