Breaking News

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे लाटणे घेऊन धरणे आंदोलन

सांगली, दि. 16, सप्टेंबर - थकित मानधन मिळावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी गत चार दिवसापासून संपावर असणार्या सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी  सेविका व मदतनीस यांनी शुक्रवारी सांगली जिल्हा परिषद मुख्यालयासमोर राज्य शासनाविरोधात हातात लाटणे घेऊन धरणे आंदोलन केले. दीपावलीपर्यंत आपल्या  मागण्यांचा गांभीर्याने विचार झाला नाही, तर राज्य शासनाविरोधात याचिका दाखल करून संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही अंगणवाडी  सेविका व मदतनीस यांच्यावतीने देण्यात आला.
थकित मानधन मिळावे, यासह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाखाहूनही अधिक अंगणवाडी सेविका व मदनतीस दि. 11 सप्टेंबरपासून संपावर  गेल्या आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, इतर शासकीय कर्मचार्यांप्रमाणे मानधन मिळावे, शासकीय सुट्टी मिळावी, पेन्शन योजना  व अंगणवाडीतील मुलांना चांगला पोषण आहार मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे.  त्यात सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.
गत चार दिवसापासून सुरू असलेल्या या संप आंदोलनाची राज्य शासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी पाचव्या दिवशी अंगणवाडी सेविका व  मदतनीस यांच्यावतीने सांगली जिल्हा परिषद मुख्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी हातात लाटणे दाखवत अंगणवाडी सेविका व  मदतनीस यांनी राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला. राज्य शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्यांबाबत दीपावलीपूर्वी ठोस निर्णय घ्यावा.  अन्यथा, राज्य शासनाविरोधात याचिका दाखल करून तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या सांगली जिल्हा  उपाध्यक्षा आनंदी भोसले यांनी दिला.