Breaking News

भूमिपूत्रांची रोजगाराची संधी हिरावून घेतल्यास उद्रेक खा. उदयनराजे

सातारा, दि. 28 (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी येथील टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलले जाणार असल्याने स्थानिक भूमिपूत्रांच्या  रोजगारावर हिरावला जाणाची भिती व्यक्त होत आहे. स्थानिक भुमीपूत्रांना टोलनाक्यामुळे मिळालेली रोजगाराची संधी व्यवस्थापन बदलल्याने हिरावून घेतल्यास  टोल नाका चालू देणार नाही. ‘तुम्हाला उद्रेक पहायचा असले तर पहा’ अशा शब्दात सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले  यांनी आनेवाडी टोल नाका व्यवस्थापनाला सुनावले, दरम्यान, स्थानिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले तर, अनर्थ घडेल, असा इशाराही त्यांनी पोलिस  प्रमुख संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलताना दिला.
साताराकडून पुण्याकडे जाताना, सातारच्या जवळच आनेवाडी, ता. सातारा येथे राष्ट्रीय महामार्गावर नॅशनल हायवे ऑथरिटी ऑफ इंडीयाच्या अखत्यारितील टोल  नाका आहे. या टोल नाक्याचे व्यवस्थापन रिलायंन्सच्या वतीने 1 आक्टोबरपासून बदलले जाणार आहे. तसेच सध्या काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना हटवून  दुसर्‍या कर्मचार्‍यांना नेमले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक कर्मचार्‍यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे, असे गार्‍हाणे टोलवरील कर्मचार्‍यांनी  खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडले.
कामगारांचे निवेदन मिळताच खासदार उदयनराजे यांनी तडक आनेवाडी टोल नाका गाठला. स्थानिक भूमिपूत्रांना कामावरुन काढून टाकण्याची भाषा जरी केली तरी  टोल नाका चालू देणार नाही. अशा शब्दात त्यांनी व्यवस्थापनाला सुनावले. त्याचवेळी त्यांनी पोलीस प्रमुख संदिप पाटील यांच्याशीही दुरध्वनीवरुन बोलताना,  स्थानिक कर्मचार्‍यांवर अन्याय झाला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यास सर्वस्वी टोल व्यवस्थापन जबाबदार राहील, याची नोंद घ्या असेहीे  बजावले.
दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आनेवाडी टोलनाक्यावर आले त्यावेळी, स्थानिक कर्मचार्‍यांसह मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.  राष्ट्रीय महामार्गाच्या वेगवेगळ्या कारणासाठी आमच्या महामार्गालगतच्या जागा कवडीमोल किंमतीत घेतल्या आहेत. आता आमच्या मुलांना कामावरुन काढले तर  आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार असे गार्‍हाणे खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे स्थानिकांनी निवेदनाद्वारे मांडले होते.