Breaking News

भगवानगडावर दसर्‍या अगोदर शिमगा!

दि. 26, सप्टेंबर - नगर व बीड जिल्ह्यावरच्या सीमेवर असलेला भगवानगड हे राज्यातील वंजारी समाजाचं दैवत. गेल्या दोन वर्षांपासन भगवानगड तिथं  मिळणार्‍या संदेशाऐवजी वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आला आहे. वंजारी समाजाचे नेते गोपीनाथ मुंडे हे दर दसर्‍याला भगवानगडावरून काय संदेश देतात, याकडं पूर्वी  समाजाचं लक्ष असायचं. गोपीनाथराव असताना भगवानगडावर लाखोंचे मेळावे व्हायचे. ऊसतोडणी मजूर असलेला वंजारी समाज भगवानगडावर मिळणारा संदेश  घेऊनच राज्यात ऊसतोडीला जायचा. मुंडे हे जरी वंजारी समाजाचे नेते होते, तरीही त्यांनी भगवानगडावरून इतर मागासवर्गीय समाजाचं संघटन करण्यावर भर  दिला होता. देशातील मोठमोठ्या नेत्यांना मुंडे यांनी भगवानगडावर आणलं होतं. गोपीनाथराव आणि भगवानगडाचे प्रमुख नामदेवशास्त्री महाराज यांच्यात समन्वय  होता. त्यांनी कधीही वाद उद्भवू दिला नाही. मुंडे यांच्या पश्‍चात प़रळीला गोपीनाथगड बांधण्यात आला आहे. मुंडे यांच्यानंतर तिथं राजकीय मेळावे घ्यावेत,  भगनवानगडावर नकोत, अशी भूमिका नामदेवशास्त्री यांनी घेतली. नामदेवशास्त्री यांची ही भूमिका स्वागतार्ह आहे. त्यांची ही भूमिका सर्वंच नेत्यांबाबत सारखीच  असायला हवी. त्यात धनंजय मुंडे यांचाही अपवाद करायला नको. अर्थात नामदेवशास्त्री यांनी कुणाला मेळावा घेऊ दिला आणि कुणाला नाकारला, असं झालेलं  नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेता त्यांच्याबाबत पक्षपात केला, असं ही म्हणण्याची अजून सोय नाही. राज्याच्या ग्रामविकासमंत्री  पंकजा मुंडे - पालवे व  नामदेवशास्त्री महाराज यांच्यात वितुष्ट असल्यानं पंकजा यांना दसरा मेळाव्याला परवानगी नाही आणि त्यांच्या विरोधकांना नंतर मेळावा घ्यायला परवानगी असं  करता येणार नाही, हे नामदेवशास्त्री चांगलेच जाणून आहेत. नामदेवशास्त्री यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात कोणत्याही राजकीय नेत्यांच्या नावाचा उल्लेख  केलेला नाही. भगवानगडावर राजकीय मेळावा घेऊ न देण्याचा त्यांचा निर्धार पक्का दिसतो. भगवानगडावर दर्शनासाठी कुणालाही मनाई न करता फक्त राजकीय  मेळावा घेऊ न देण्याची भूमिका जर महंतांनी घेतली असेल, तर तिचं स्वागत करायला हवं. धार्मिक स्थळी येताना कुणीही फक्त भक्त म्हणून येऊन परमेश्‍वराच्या  चरणी लीन होणार असेल, तर त्याला कोणीच आडकाठी आणू शकत नाही, हे जितकं खरं तितकंच आकांडतांडव करून भगवानगडावर राजकीय मेळावा घेण्याचा  निर्धार करणं चुकीचं आहे. देवाला, धार्मिक स्थळांना तरी राजकारणापासून बाजूला ठेवलं पाहिजे. राजकीय जोडे बाजूला काढून दर्शन घेतलं, तर त्याला  नामदेवशास्त्रीही विरोध करू शकणार नाहीत; परंतु राजकीय शक्तीप्रदर्शनासाठीच धार्मिक स्थळांचा वापर केला जाणार असेल, तर मात्र तो रोखला पाहिजे.
गेल्या वर्षी भगवानगडावर राजकीय मेळावा घेण्यास नामदेवशास्त्रींनी विरोध केला होता. त्या वेळी ही नामदेवशास्त्री यांच्यावर कडवट टीका झाली होती.  नामदेवशास्त्री यांनी त्या वेळी घेतलेली भूमिका किती योग्य होती, हे नंतर स्पष्ट झालं. कोणतीही धार्मिक विश्‍वस्त संस्था जेव्हा एखाद्या कायद्यानं नोंदलेली असते,  तेव्हा तिच्या परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम कुणालाही घेता येत नाही. धर्मदाय आयुक्तांकडं नोंदलेल्या संस्थेच्या उद्दिष्टांत तसं म्हटलेलं असतं. विश्‍वस्त  संस्थेच्या कायद्यानुसार राज्यातल्या कोणत्याही धार्मिक संस्थांना त्यांच्या आवाराचा उपयोग राजकीय मेळाव्यासाठी करता येत नाही; परंतु आपल्याकडं बहुतांश  राजकीय पक्षांच्या प्रचाराचा नारळ धार्मिक स्थळी फोडून कायदा धाब्यावर बसविण्याचे प्रकार होतात. या पार्श्‍वभूमीवर नामदेवशास्त्री कायदा पाळत असतील, तर  त्याला विरोध करता येणार नाही. त्यांचं काही चुकीचं असेल, तर न्यायालयात जाऊन राजकीय मेळाव्याला परवानगी आणावी. गोपीनाथराव असताना मेळावे घ्यायला  परवानगी आणि आता का नाही, हा प्रश्‍न रास्त आहे; परंतू पूर्वी जी चूक झाली, ती आता दुरुस्त करायची असेल आणि आताचं वागणं सरकारी नियमांच्या अधीन  राहून असेल, तर पूर्वीप्रमाणंच चालू द्या, असं म्हणणं कायद्याशी सुसंगत नाही. गेल्या वर्षी नगरला अनिल कवडे हे जिल्हाधिकारी होते. त्यांनी नियमांच्या अधीन  राहून मेळाव्याला गडावर परवानगी देता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्या वेेळी महादेव जानकर यांनी कवडे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांवर किती  खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, हे सर्वांंच्या स्मरणात आहे. सदाभाऊ खोत यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना बारामतीचा कसा संदर्भ दिला  होता आणि त्या मेळाव्यातील भाषा किती आक्षेपार्ह होती, हे दूरचित्रवाहिन्यांवरील बातम्यांतून दिसत होतं. पंकजा यांना राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळायला हवं,  ही त्यांची इच्छा असेल, तर त्यात गैर काहीच नाही; परंतु त्यासाठी भगवानगडाला वेठीला धरणं आणि मेळाव्यात राजकीय टीकाटिप्पण्णी करणं गैर आहे.  भगवानबाबा स्वत: जाती, पातीच्या विरोधात होते. त्यांनी सर्वधर्मसमभावाची संकल्पना राबविली. एवढंच नव्हे, तर आपला उत्तराधिकारी नेमताना त्यांनी तो कोणत्या  जातीचा आहे, याचा विचार केला नाही. आताचे महंत नामदेवशास्त्री भगवानबाबांचे निकटवर्तीय असले, तरी त्यांनी आता भगवानगड हा केवळ एका समाजाच्या  मेळाव्यापुरता मर्यादित न ठेवता तिथं सर्वधर्मिय आले पाहिजेत, अशी भूमिका घेतली असेल, तर त्यात वावगं काही नाही. संत हे राग, लोभ, मत्सर, द्वेष यांच्या  पलीकडं असतात. त्यांच्यादृष्टीनं कोण आपला, कोण परका असा भेदभाव असत नाही. वंजारी समाजाला एकत्र यायचं असेल, तर त्यासाठी भगवानगड हवाच  कशाला? तिथं दर्शन घेऊन गडाच्या पायथ्याशी राजकीय मेळावा घ्यायला कुणीच विरोध करू शकत नाही. नामदेवशास्त्री हे महंत आहेत. त्यांनीही राजकीय वादात  अडकून पडण्यात अर्थ नाही. त्यांच्या समर्थकांनीही राजकीय नेत्यांच्या समर्थकांसारखे इशारे, प्रतिइशार्‍याची भाषा करणं गैर आहे.
दसरा मेळाव्याबाबत पंकजा यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यांनी श्रद्धा आणि सबुरीची भूमिका घेतली असेल, तर त्यांच्या समर्थकांनी हातघाईवर  येण्याचं कारण नाही. नामदेवशास्त्रींनी नगरच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन गडावर राजकीय, सामाजिक मेळावे अथवा कोणत्याही उद्घाटनाला परवानगी देऊ  नये, अशी मागणी केली आहे़  जिल्हा प्रशासनानं त्यावर सारासार विचार करून परवानगी द्यायची, की नाही, याचा निर्णय कायदेशीर तरतुदींचा विचार करून  घ्यायचा आहे. कितीही राजकीय हस्तक्षेप झाला, तरी त्याला न जुमानता  योग्य तो निर्णय घेण्याचं धाडस आता प्रशासनानं करायला हवं. नामदेवशास्त्रींची मागणी  चुकीची असेल, तर आपलं मंत्रिमंडळातील वजन वापरून मुख्यमंत्र्यांकडून भगवानगडावर मेळावा घेण्यासाठी परवानगी आणावी. मुुंडे समर्थक गडाच्या पायथ्याशी  नव्हे, तर गडावरच मेळावा घेण्याचा हट्ट धरत असून तो ही चुकीचा आहे. भगवानगडावर वारकरी शाळा, अनेक संस्था असताना तिथं राजकीय मेळावा न घेण्याची  महंतांची भूमिका योग्य आहे. अशा काळात अट्टहास न धरता भगवानगडावर दर्शन घेऊन सर्वांनीच गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला, तरी जो राजकीय उद्देश साध्य  करायचा आहे, तो साध्य होईल. मेळावा कुठं घेतला यापेक्षा संदेश, दिशा काय आहे, हे जास्त महत्त्वाचे असतं. दसरा मेळाव्यासाठी मुुंडे समर्थकांनी भगवान गडाच्या  पायथ्याशी सहा एकर जमीन घेतल्याची बातमी मागं छापून आली होती. जर मेळाव्यासाठी जमीन घेतलेली असेल, तर भगवान गडावर मेळाव्या घेण्याचा अट्टहास  कशासाठी हा नामदेवशास्त्रींचा प्रश्‍न रास्त आहे. भगवानगडावरील मेळावा रोखण्याचा महंतांना अधिकार नाही, अशी भूमिका मुंडे  समर्थकांनी घेतली आहे. त्यांना  कायद्याची, धार्मिक विश्‍वस्त संस्थांच्या नियमांची माहिती दिसत नाही. तोडगा काढण्यासाठी गडावर गेलेल्या मुंडे समर्थकांना हाकलून लावत महंतांनी समर्थकांवरकरवी  मारहाणीची भाषा केली, असा मुंडे समर्थकांचा आरोप असून त्याची चौकशी करायला हवी. असं काही घडलं असेल, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करायलाही हरकत  नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोमनाथ खेडकर यांनी थेट ‘सुपारी घेण्या’ची भाषा करणं कितपत योग्य आहे?