Breaking News

लातुर तालुक्यात तीन ठिकाणी सरपंच बिनविरोध !

लातूर, दि. 25, सप्टेंबर - सरपंचपदासाठी पहिल्यांदाच थेट जनतेतून निवड होणार असतानाच तालुक्यातील अंधोरी, मांडणी आणि दगडवाडी या तीन गावात  सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. अन्य दोन ग्रामपंचायती मधील सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. शुक्रवारी (ता. 22) नामनिर्देशनपत्र दाखल  करावयाच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी 227 तर 42 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी 1 हजार 23 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. तालुक्यातील 42  ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, त्यापैकी अंधोरी येथील सरपंचपद हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव असताना तेथे संगीता पिट्टलवाड  यांनी एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मांडणी येथील सरपंचपद हे नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी राखीव होते. येथून  विठ्ठल गुंडरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी दगडवाडी येथील सरपंच पदासाठी आरक्षण होते. येथून सुमित्राबाई मुंडे  यांची बिनविरोध निवड झाली आहे. मांडणी येथे सात तर दगडवाडी येथे नऊ असे सदस्य संख्ये एवढेच नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने या दोन्हीही ग्रामपंचायती  मधील सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, या बिनविरोध निवडीबाबत अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे.