Breaking News

स्वाईन फ्लू नियंत्रणसाठी सीएसआरमधून मोफत लस -गिरीष महाजन

नाशिक, दि. 03, सप्टेंबर - स्वाईन फ्लू आजारावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करावी. स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सीएसआर  निधीतून सर्व शासकीय रुग्णालयात प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करू देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.शासकीय विश्रामगृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी  अधिकारी दिपककुमार मीना, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
महाजन म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी स्वाईन फ्लूमुळे 46 मृत्यु झाले आहेत आणि 311 रुग्णांना या आजाराचा संसर्ग झाला आहे. नियंत्रणात आणण्यासाठी खाजगी  वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा महापालिकास्तरावर घेण्यात यावी. स्वाईन फ्लूची सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनीदेखील जवळच्या  शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महापालिका रुग्णालयात तपासणी करून घणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.  जिल्ह्यातील गरोदर मातांना स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने त्यांना स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्यात यावी,  असे निर्देश त्यांनी दिले.
अस्वच्छतेमुळे आजारासाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करावे. नाशिक शहरात युद्धपातळीवर  स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश त्यांनी दिले. कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या स्वच्छता व्यवस्थेच्या धर्तीवर स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.
सीएसआरमधून प्रतिबंधक तस उपलब्ध करून देण्यसासाठी स्वत: पालकमंत्री प्रयत्न करणार असून 10 सप्टेंबरपर्यंत कार्यवाही सुरू करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.  बैठकीस आरोग्य विभाग आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी पोलीस अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील  सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.