Breaking News

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकलेल्या 7 जणांची तब्बल तीन तासांनी सुटका

नांदेड, दि. 16, सप्टेंबर - नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येवून अडकलेल्या सात पर्यटकांना तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर  सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.सहस्त्रकुंड धबधबा पाहण्यासाठी नेहमीप्रमाणे दूरदूरवरून पर्यटक आले होते. त्यापैकी सात जणांना हा धबधबा जवळून पाहण्याचा  मोह झाला आणि ते धबधब्याजवळ गेले. मात्र वरच्या भागात जोरदार पाऊस झालेला असल्याने अचानक या धबधब्याजवळची पाणी पातळी वाढू लागली. त्यामुळे हे  सात जण उंच टेकडीवर चढले आणि पाणी वाढल्याने तेथेच अडकून पडले. हा प्रकार लक्षात येताच अन्य पर्यटकांपैकी काही जणांनी पालिसांना व मंदिर समितीला  याबाबत तातडीने माहिती दिली. अडकलेल्या पर्यटकांमध्ये शामराव राठोड वय 70 राहणार राजगड, कांताबाई चव्हाण वय 40 रा. बोधडी, जनार्दन गायकवाड वय  22 रा. चिखली, संदीप नरवाडे वय 23 रा. गोकुंदा, रवीराम राठोड वय 27 रा. चिंचोली, तोतीबाई राठोड वय 70 रा. बोधडी, गोची जाधव रा. मुरली यांचा  समावेश होता. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथील स्थानिक रहिवासी मच्छीमार युवक देविदास तासेवाड, विवेकानंद पाटील, संभाजी झाडे, दिलीप  तुमलवाड, नामदेव राठोड, संदीप काळे, सयाजी टोकलवाड, सासईनाथ वासेवाड या युवकांनी दोरखंडाच्या सहाय्याने प्रयत्न करून तीन तासानंतर या सात जणांना  सुखरूप सोडविले. या घटनेने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न चर्चेत आला आहे.