Breaking News

ठाणे शहरात 10 व्या दिवसापर्यंत झाले 42,452 श्री मूर्तींचे विसर्जन

ठाणे, दि. 07, सप्टेंबर - महाराष्ट्रात पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना यशस्वीपणे राबविणा-या ठाणे महापालिकेतर्फे निर्माण करण्यात आलेल्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेतंर्गत काल 10व्या दिवशी एकूण 10,026 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. दरम्यान दिड दिवस, सात दिवस आणि दहा दिवस मिळून एकूण 42,452 मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. ठाणेकर भाविकांनी पर्यायी विसर्जन व्यवस्थेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. महापालिकेच्या पारसिक विसर्जन महाघाटावर दहाव्या दिवशी घरगुती आणि सार्वजनिक मिळून एकूण 989 श्री मूर्तींचे विसर्जन झाले. तर कोलशेत विसर्जन महाघाटावर 697 मूर्तींचे विसर्जन झाले, कोपरी घाटावर 323 श्री मूर्तींचे विसर्जन झाले. यावर्षी दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवस असे मिळून एकूण 42,452 गणेश मूर्तींचे विसर्जन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आले. 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली होती. या व्यवस्थेतंर्गत रायलादेवी, आंबेघोसाळे, उपवन, टिकुजिनीवाडी, रेवाळे आणि खारीगाव येथे कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पारसिक रेतीबंदर अणि कोलशेत बंदर येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावर्षी महापलिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या श्री मूर्तींचे कृत्रीम तलावामध्ये वाजतगाजत विधिवत विसर्जन केले. यावर्षी दहाव्या दिवशी मासुंदा तलावामध्ये 704 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रायलादेवी येथील दोन कृत्रीम तलावात एकूण 1051 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. उपवन आणि नीळकंठ वुडस् येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी 1055 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आंबेघोसाळे येथील कृत्रीम तलावामध्ये जवळपास 189 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मानपाडा प्रभाग समितीतंर्गत करण्यात आलेल्या पर्यायी व्यवस्थेतंर्गत 1405 तर कळवा प्रभाग समितीतंर्गत एकूण 503 तर मुंब्रा प्रभाग समितींतर्गत 2326 मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.
दरम्यान महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन प्रक्रियेला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज होती. यामध्ये अनिरुध्द अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे जवळपास 500 स्वयंसेवक, 200 महापालिकेचे सुरक्षारक्षक, जीवरक्षक आणि अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या सर्वांच्या सहकार्याबद्दल महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्वांचे आभार मानले.