Breaking News

अजिंक्यातारा कारखान्याच्या कामगारांना वेतनकरार लागू

सातारा, दि. 09 (प्रतिनिधी) : स्व. भाऊसाहेब महाराजांच्या आदर्श विचारसरणीचा अवलंब करत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने  नियोजनबध्द कामकाज करून कारखान्यास उर्जितावस्था प्राप्त करून दिली हे सर्वश्रुत आहे. संचालक मंडळाच्या काटकसरीच्या आणि नियोजबध्द धोरणाला  कारखान्यातील कामगार, कर्मचार्‍यांनी नेहमीच सकारात्मक सहकार्य केले. प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांनी निष्ठेने कामकाज केले. कामगारांमुळे कारखान्याला  खर्‍या अर्थाने उजिर्ंतावस्था प्राप्त झाली आहे, असे गौरवोद्गार अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले  यांनी काढले. 
शासनाने नेमलेल्या त्रिपक्षीय सदस्य समितीने राज्य साखर कारखाना कामगार संघटनेशी व साखर उद्योगाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सर्वमान्य निर्णय होईपर्यंत 900  रुपये अंतरीम वाढ जाहीर केली होती. याची तातडीने अंमलबजावणी म्हणून अजिंक्यातारा कारखान्याच्या संचालक मंडळाने दि. 1 जानेवारी 2016 पासून प्रत्येकी  900 रुपये प्रमाणे अंतरीम वाढ तातडीने लागू केली. तसेच त्रिपक्षीय समितीचा 15% वेतनवाढीचा निर्णय झाल्यानंतर व शासनाच्या मान्यतेचे परिपत्रक आल्यानंतर  दि. 1 जानेवारी 2017 पासून 15% पगारवाढीची कारखाना व्यवस्थापनाने अंमलबजावणी केली. तसेच दि. 19.7.2017 रोजी कारखाना कामगार युनियन,  कारखान्याचे व्यवस्थापन व सहाय्यक कामगार आयुक्त-सातारा, यांच्यामध्ये त्रिपक्षीय करारसुध्दा झाला. या करारावर कारखान्याच्यावतीने कारखान्याचे चेअरमन  सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, कार्यकारी संचालक संजीव देसाई व कारखाना कामगार युनियनच्या  वतीने कामगार प्रतिनिधी अध्यक्ष कृष्णा हणमंत धनवे, जनरल सेक्रेटरी सयाजी कदम, उपाध्यक्ष लहूराज पेातेकर, सदस्य सत्यवान गायकवाड  यांच्या सह्या केल्या. हा  करार सहाय्यक कामगार आयुक्त सातारा यांच्या समक्ष होऊन त्यांचेकडे कराराची प्रत देण्यात आली आहे.
संचालक मंडळाने कामगारांच्या हिताचा निर्णय घेतल्यामुळे कारखाना कामगार संघटनेच्या वतीने कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे,  मार्गदर्शक संचालक आ. भोंसले, कार्यकारी संचालक संजीव देसाई व संचालक मंडळाचा सत्कार सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते.  यावेळी कारखान्याचे चेअरमन सावंत, व्हा. चेअरमन शेडगे, कार्यकारी संचालक देसाई यांच्यासह सर्व संचालकांची प्रमुख उपस्थिती होती.