Breaking News

जिल्ह्याच्या पूर्वेकडील भागात 41 टँकरद्वारे पाणीपुरवठा

सातारा, दि. 09 (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील दुष्काळी पटट्यात पावसाळयातही टँकरने पाणी पुरवठा सुरु असून  पिण्याच्या पाण्याची ओरड  कायम आहे. सातारा जिल्ह्यात सध्या 68 गावे व 253 वाड्यांमधील 88 हजार 466 नागरिकांना 41 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान पश्‍चिम  भागातही गेल्या आठवड्यापर्यंत पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे धरणे 75 ते 80 टक्के भरली आहेत. सध्या पाऊस उघडला असल्याने शेतकर्‍यांचे डोळे  आकाशाकडे लागले आहेत. दुष्काळी तालुक्यात पावसाने पाठ फिरवली असल्याने गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर ऐन पावसाळयातही सुरु आहेत.
माण तालुक्यातील 22 गावे व 168 वाड्यांमधील 36 हजार 382 नागरिकांना व 16 हजार 754 जनावरांना 14 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खटाव  तालुक्यातील 15 गावे 36 वाड्यांमधील 18 हजार 555 नागरिकांना 8 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोरेगाव तालुक्यातील 22 गावांमधील 17 हजार  624 नागरिकांना 10 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील 9 गावे व 49 वाड्यांमधील 15 हजार 905 नागरिकांना 9 टँकरने पाणीपुरवठा  करण्यात येत आहे. जिल्ह्यात 68 गावे 253 वाड्यांमधील 88 हजार 466 नागरिकांना व 16 हजार 815 जनावरांना 49 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत  असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सप्रे यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्यात जून महिन्यात 183 गावे व 691 वाड्यांमधील नागरिकांना 135 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र ऑगस्टमध्ये टँकरच्या संख्येत  कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.